डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर घाबरलेल्या पाकचा हाफिज सईदला दणका, जमात-उद-दावाच्या फंडिंगवर आणली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 08:45 AM2018-01-02T08:45:49+5:302018-01-02T09:33:52+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कान उघाडणी केल्यानं आता पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

hafiz saeeds jamaatud dawa barred from collecting charity | डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर घाबरलेल्या पाकचा हाफिज सईदला दणका, जमात-उद-दावाच्या फंडिंगवर आणली बंदी 

डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर घाबरलेल्या पाकचा हाफिज सईदला दणका, जमात-उद-दावाच्या फंडिंगवर आणली बंदी 

Next

इस्लामाबाद - दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणुकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी कान उघाडणी केल्यानंतर आता पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदला टार्गेट करत पाकिस्तानानं जमात-उद-दावाच्या परदेशी फंडिंगवर बंदी आणली आहे. याशिवाय आणखी तीन दहशतवादी संघटनांवरही कारवाई करण्यात आली आहे.  शिवाय, हाफिज सईदच्या मालमत्तांवरदेखील टाच आणण्याची पाकिस्ताननं तयारी केली आहे. अमेरिकेच्या कडक भूमिकेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

पाकिस्तानला ट्रम्प यांचा सज्जड दम
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी आजवर अमेरिकेच्या कोणाही राष्ट्राध्यक्षाने वापरली नाही अशी कडक भाषा वापरत पाकिस्तानला सज्जड इशारा देणारे ट्विट केले. पाकवर कृतघ्नपणाचा ठपका ठेवण्यासोबत अमेरिकेचा पश्चात्तापही ट्रम्प यांनी ध्वनित केला. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की, शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते.

ट्रम्प यांच्या या ट्विटमधील ‘आता बस्स झाले’ (नो मोअर) हे शवटचे शब्द मोठे सूचक मानले जात आहेत. पाकिस्तानच्या दुटप्पी वागण्याने अमेरिकेची सहनशीलता संपत आली आहे व पाकिस्तानला दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याच्या निर्णयाप्रत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प येत चालले आहेत, अशा बातम्या गेले काही दिवस येत होत्या.

जमात-उद-दावावर सरकारकडून जप्तीची घोषणा 
अमेरिकेनं फटकारल्यानंतर दबावाखाली येऊन पाकिस्तान सरकारनं म्हटले की, हाफिज सईदची संघटना जमात-उद-दावा व फलाह-ए-इंसानियत फाउंडेशनला आपल्या ताब्यात घेणार आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयानं कायदे मंत्रालय व सर्व पाच प्रांतांच्या सरकारांना याबाबत विस्तृत स्वरुपात योजना आखण्याचे आदेश दिले आहे.  

हाफिज सईदला बसणार दणका

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद यांच्यावर थेट हात न टाकता त्याच्या धर्मादाय संस्था आणि संपत्ती ताब्यात घेऊन आर्थिक नाड्या आवळण्याचा बेत पाकिस्तान सरकारने आखला आहे.
हाफीजची संपत्ती कशी ताब्यात घेता येईल, यावर १९ डिसेंबर रोजी विविध प्रांतीय आणि संघीय सरकारच्या विविध खात्यांच्या अधिका-यांच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच त्या दृष्टीने योजना प्रांतीय व संघीय सरकारला २८ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निदेश देण्यात आले होते.

या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी असलेल्या तीन वरिष्ठ अधिका-यांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. १९ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या दस्तावेजानुसार सईदच्या दोन धर्मादाय संस्थांची नावे आहेत. वित्तीय कृती गट ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांच्या आर्थिक रसदविरुद्ध काम करते. या संस्थेने अनेकदा दहशतवादी संस्थांचे आर्थिक स्त्रोत बंद करण्याबाबत पाकिस्तानला सल्ला दिला होता.

जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुखवटा असलेल्या संघटना आहेत, असे अमेरिकेने घोषित केले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास लष्कर-ए तैयबाच जबाबदार असल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेने केला आहे. अमेरिकेनेही हाफीज सईदला दहशतवादी घोषित केलेले आहे.  

पाकच्या हाफिज प्रेमावर अमेरिका नाराज

जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुखवटा असलेल्या संघटना आहेत, असे अमेरिकेनं घोषित केले आहे. या संघटनेवर भारतात 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला केल्याचा आरोप आहे. या भ्याड हल्ल्यात 166 जणांचा बळी गेला होता. तर दुसरीकडे, हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर आता तो स्थानिक निवडणुकांमध्ये उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.  

Web Title: hafiz saeeds jamaatud dawa barred from collecting charity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.