Girl Guinness Book Application | पायाने काढलेल्या चित्राची नोंद घेण्यासाठी मुलीचा गिनिज बुककडे अर्ज

ठळक मुद्देजान्हवी मांगती या १९ वर्षीय तरुणीनं १४० स्क्वेअर मीटर इतकं मोठं चित्र आपल्या पायांनी साकारलं आहे. पायाने काढलेलं हे जगातील सगळ्यात मोठं चित्र असल्याचं तिचं म्हणणं आहे.या चित्राला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा किताब मिळावा याकरता तिने अर्जही दाखल केलाय.

हैदराबाद : एखाद्याच्या अंगी कला असली की तीच कला त्या व्यक्तीला एका उंचीवर नेत असते. चित्रकला हा विषय जरी प्रत्येकाला लहानपणापासून शाळेत शिकवला जात असला तरीही या कलेत खूप कमी लोक पारंगत होतात. हाताने चित्र काढण्यासाठी ज्यांचा हात धजावत नाही त्यांच्यासाठी एक अवाक् करणारी गोष्टी आम्ही घेऊन आलो आहोत. हैदराबादमधील एका तरुणीनं चक्क पायाने एक भलं-मोठं चित्र साकारलं आहे. आता तुम्ही म्हणाल की कित्येक कलाकार काढतात पायाने, त्यात या तरुणीचं काय नवं? तर, या तरुणीनं काढलेलं चित्र खास आहे कारण, पायाने काढण्यात आलेल्या चित्रापैकी या तरुणीचं चित्र सगळ्यात मोठं असल्याचा दावा तिनं केला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जान्हवी मांगती असं या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे. तिनं १४० स्क्वेअर मीटर इतकं मोठं चित्र आपल्या पायांनी साकारलं आहे. जगातील सगळ्यात मोठं चित्र असल्याचं तिचं म्हणणं आहे. या चित्राला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा किताब मिळावा याकरता तिने अर्जही दाखल केलाय. खरंतर जान्हवी ही मुळची हैदराबादची असली तरीही सध्या ब्रिटनच्या वॉर्विक विद्यापीठात अर्थशास्त्र आणि इंडस्ट्रीअल ऑर्गनायझेशनचं शिक्षण घेतेय. तिच्यामते आजवर पायाने ए‌वढं मोठं चित्र कोणीच काढलं नाहीए. याआधीचे रेकॉर्ड १०० स्क्वेअर मीटर असल्याचंही ती म्हणाली आहे. 

व्हिडीयो पाहण्यासाठी क्लिक करा -

जान्हवी खरंतर अष्टपैलू कलाकार आहे. तिला फक्त चित्रकला ही एकच कला अवगत नसून अनेक कला तिला येतात. तिला नृत्यही आवडतं, ती गाणंही गाते आणि तीनं राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल हा खेळही खेळला आहे. ती म्हणते की, एकदा तिनं नाचता नाचता कमळाच्या फुलाचं चित्र काढलं होतं. तसंच, नाचताना मोराच्या पिसांचं चित्रही काढलं होतं. त्यामुळेच तिला ही कल्पना सुचली आणि जागतिक विक्रम करायचं ठरवलं. एखादी कला माणसाला कसं प्रसिद्ध करू शकते हे जान्हवीच्या उदाहरणावरून स्पष्ट होतंय. तिच्या या अष्टपैलू कलेचं सगळीकडेच कौतुक होतंय. तिच्या या चित्राविषयी जेव्हा सोशल मीडियावर माहिती पसरली तेव्हा तिला सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्यात.  

आणखी वाचा - तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे