ऑनलाइन लोकमत
 
मनिला, दि.16- तीन आठवडे इसिसच्या ताब्यात गेलेल्या मारावी शहराच्या 90 टक्के भागावर फिलीपाइन्सच्या सैन्याने ताबा मिळवल्याचा दावा फिलीपाइन्सने केला आहे. गेले काही दिवस मारावी इसिसच्या ताब्यातून हे शहर परत मिळवण्यासाठी फिलीपाइन्सची सुरक्षा दले प्रयत्न करत होते.
 
सुरक्षा दले आणि इसिसचे दहशतवादी यांच्यामध्ये होत असलेल्या चकमकीमुळे या शहरातील हजारो लोकांनी पलायन केले असून अजूनही काही नागरिक चकमकीच्या ठिकाणी अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चकमकींमध्ये आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये इसिसचे 206 लोक, 58 सैनिक आणि 26 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
 
आम्ही आता मारावीच्या आर्थिक केंद्रावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून लवकरच ही लढाई थांबेवल अशी माहिती फिलिपिनो सैन्याचे प्रवक्ते ले. कर्नल. जो. एर. हेरेरा यांनी दिली आहे. काही धार्मिक नेत्यानी हवाई हल्ले थांबवून इसिसशी बोलणी करावी अशी विनंती फिलिपाइन्सचे राष्ट्ध्यक्ष  रॉड्रिगो ड्युटर्टे यांना केली होती. मात्र सैन्याने हवाई हल्ले चालूच ठेवले असून तीव्र हल्ले सुरुच ठेवले आहेत.  फिलिपाइन्समध्ये इसिसचे दहशतवादी घुसल्यानंतर संपुर्ण जगाने आश्चर्य व्यक्त केले होते. इतकी वर्षे फक्त मध्यपुर्वेत आणि आजूबाजूच्या देशांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने पश्चिमेस अस्तित्व असलेल्या दहशतवादी संघटना इसिसने फिलीपाइन्समध्ये पाय पसरल्याने फिलीपाइन्सच्या शेजारी देशांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे. इंडोनेशियाचे लष्कर प्रमुख जनरल गॅटट नुर्म्यांतो यांनी इंडोनेशियाच्या प्रत्येक प्रांतामध्ये इसिसने पाय पसरले असण्याची शंका दोनच दिवसांपुर्वी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मारावी शहर असलेले बेट इंडोनेशियाच्या जवळ असल्यामुळे इसिसचे इंडोनेशियात येणे अत्यंत सोपे असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.