पेशावर : प्रख्यात बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे येथील वडिलोपार्जित जुने घर कोसळले. ते मोडकळीस आले होते. या घराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.
ऐतिहासिक क्विस्सा खवानी बाजाराजवळील मोहल्ला खुदा दाद भागात असलेल्या या घराचा आता केवळ दर्शनी भाग आणि दरवाजा तेवढा शाबूत आहे, असे सांस्कृतिक वारसा परिषदेचे सरचिटणीस शकील वहिदुल्ला यांनी सांगितले. पाकच्या पुरातत्त्व विभागाने २०१४ मध्ये या घराला राष्ट्रीय वारसा घोषित केले होते. याउपरही त्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल शहरातील प्रतिष्ठित मंडळींनी खैबर पख्तुनख्वा प्रांत सरकारवर टीका केली आहे.
या घराच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मी राज्य सरकारला सहा अर्ज दिले; परंतु कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे वहिदुल्ला यांनी सांगितले. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना घराच्या अवस्थेबद्दल माहिती देण्यात आल्याने त्या हताश झाल्या, पण आम्ही घराची पुनर्बांधणी करणे शक्य होणार आहे. हे घर खिळखिळे झाले होते. त्यामुळे त्याचे संवर्धन शक्य नव्हते, असे पुरातत्व विभागाने सांगितले. या घराची पुनर्बांधणी करणे हाच त्याचे संवर्धन करण्याचा एकमेव मार्ग होता. या घराच्या पुनर्बांधणीसाठी पुरातत्त्व विभागाला ते जमीनदोस्त करावे लागणार होते. दिलीप कुमार यांच्यासह अनेक बॉलीवूड तारे मूळचे पेशावरचे आहेत. त्यात कपूर परिवार, शाहरुख खान, दिवंगत विनोद खन्ना यांचा समावेश आहे. या सर्वांची पिढीजात घरे शहरात आजही अस्तित्वात आहेत. दिलीप कुमार यांचा मोहल्ला खुदा दाद येथे १९२२ मध्ये जन्म झाला होता. (वृत्तसंस्था)

- या घराचे मालकी हक्क एका व्यक्तीकडे असून, कोर्टकज्ज्यांमुळे त्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना खीळ बसलेली होती. तथापि, नव्या कायद्यामुळे पुरातत्त्व विभागाला प्राचीन महत्त्वाच्या ठिकाणी मालकी हक्क नसतानाही संवर्धन आणि पुनर्बांधणी करण्याची मोकळीक आहे.