लंडन : कोणत्याही प्रकारे हानिकारक नसलेल्या इन्फ्रारेड किरणांवर आधारित असे नवे वायरलेस इंटरनेट वैज्ञानिकांनी विकसित केले असून, त्याचा वेग सध्याच्या वाय-फायपेक्षा १०० पट अधिक असेल, शिवाय त्यावर अधिक वायरलेस उपकरणे एकाच वेळी चालविता येऊ शकतील.
वाय-फायचा कमी वेग हा प्रत्येकाचाच त्रासदायक अनुभव असतो, शिवाय अधिकाधिक वायरलेस उपकरणे वापरली जाऊ लागल्याने, उपलब्ध असलेले वाय-फाय ‘जाम’ होणे ही आणखी एक अडचण असते. या नव्या इन्फ्रारेड वाय-फायने या दोन्ही अडचणींवर मात होणार असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे.
नेदरलँडमधील एन्डोव्हेन तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या या नव्या वायरलेस प्रणालीची क्षमता, ४० गिगाबाइट््स प्रति सेकंदाहून अधिक एवढी प्रचंड आहे. एवढेच नव्हे, तर यात प्रत्येक उपकरण स्वतंत्र इन्फ्रारेड किरणावर चालणार असल्याने, यात अनेक उपकरणांना नेटवर्क ‘शेअर’ करावे लागत नाही.
या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, ही यंत्रणा वापरायला सुलभ व उभारायलाही सोपी आहे. यात वायरलेस डेटा काही केंद्रीय ‘लाइट अँटेना’मधून येतो व या अ‍ॅँटेना घराच्या छतावरही लावता येऊ शकतात. या अँटेना आॅप्टिकल फायबरमधून येणारे इन्फ्रारेड प्रकाशकिरण अचूकपणे हव्या त्या उपकरणाला पुरवू शकतात. या अँटेनांमध्ये ‘ग्रेटिंग’च्या जोड्या असतात व त्या विविध वेव्हलेंग्थच्या प्रकाश शलाका विविध कोनांतून चहूकडे पसरवितात.
या प्रकाश शलाकांची वेव्हलेंग्थ बदलली की, त्यांची दिशाही बदलते. वैज्ञानिक म्हणतात की, ‘तुम्ही हातात स्मार्ट फोन किंवा टॅबलेट घेऊन जागा बदललीत, तर दुसऱ्या प्रकाश शलाकेची अँटिना ‘टेकओव्हर’ करते व तुमचे नेटवर्क विनाखंड सुरू राहाते. या प्रणालीत नव्याने वापरात येणारे उपकरण यंत्रणेत सामावून घेणेही अगदी सोपे आहे. कारण सध्याच्या पद्धतीप्रमाणे या वाढीव उपकरणाला अन्य कोणत्याही उकरणाचे नेटवर्क ‘शेअर’ करावे लागत नाही. बसविलेल्या त्याच अँटिनाकडून वेगळ््या वेव्हलेंग्थच्या प्रकाश शलाकेवर हे नवे उपकरण स्वतंत्रपणे चालू शकते.
या नव्या प्रणालीचे प्रयोग केले, तेव्हा संशोधकांना २.५ मीटर अंतरापर्यंत ४२.८ गिगाबाइट््स प्रति सेकंद एवढा वेग मिळाला. सध्या उपलब्ध असलेले चांगल्यात चांगले वाय-फाय वापरले, तरी एवढ्या अंतरापर्यंत जास्तीत जास्त ३०० मेगाबाइट््स प्रति सेकंद एवढा वेग मिळू शकतो. म्हणजे सध्याचा वेग या नव्या प्रणालीहून शंभर पटीने कमी आहे.
वैज्ञानिकांनी सध्या या नव्या प्रकाश शलाकांवर आधारित तंत्राचा वापर फक्त डाउनलोड करण्यासाठीच करून पाहिला आहे व अपलोडसाठी पूर्वीप्रमाणे रेडिओ सिग्नलच वापरले. कारण अपलोडिंगसाठी तुलनेने इंटरनेटची खूपच कमी क्षमता
लागते. (वृत्तसंस्था)