ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 20 - दक्षिण चिनी समुद्रातल्या मालकी हक्कावरून चीनचा आधीच सीमावर्ती देशांशी वाद सुरू आहेत. दक्षिण चिनी समुद्रात चीन करत असलेल्या अतिक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे गंभीर परिणाम उमटण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या इशा-याला न जुमानता चीन लवकरच दक्षिण चिनी समुद्रातील छोट्या छोट्या बेटावर बांधकाम सुरू करण्याची योजना आखतो आहे. या बेटांवर काही इतर देशांनीही दावा केला आहे. फिलिपिन्सनं या प्रकरणात चीनच्या विरोधात पर्मनन्ट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये खटला भरला आहे. त्यावेळी कोर्टानंही चीनच्या विरोधात निर्णय दिला होता. चीनजवळ असा कोणताही पुरावा नाही, जो दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा मालकी हक्क असल्याचं स्पष्ट करू शकेल. मात्र चीननं हा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला होता.

दक्षिण चिनी समुद्र हा केवळ आंतरराष्ट्रीय व्यापाराचं माध्यम नाही, तर इथे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे. नैसर्गिक साधनांच्या बाबतीत दक्षिण चिनी समुद्र हा खूप समृद्ध आहे. चीननं 2012साली योजनाबद्धरीत्या स्काबरा शोआल क्षेत्रातील काही बेटांवर कब्जा केला होता. अमेरिकेनं या वादग्रस्त क्षेत्रात कोणतंही निर्माण करून नये, असा इशारा आधीच चीनला दिला होता. मात्र चीन अमेरिकेच्या या इशा-याकडे दुर्लक्ष करत दक्षिण चिनी समुद्रात बांधकाम सुरू करण्याच्या विचारात आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या सुरक्षेखातर चीन इथं प्रशिक्षण केंद्र बनवण्याच्या तयारीत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातूनच चीन इतर देशांवर लक्ष ठेवणार आहे.

चीनच्या विरोधात अमेरिकेच्या संसदेत एक विधेयकही सादर करण्यात आलं. त्यात दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या बांधकाम आणि इतर हालचालींवर प्रतिबंध घालण्याचं प्रस्तावित आहे. या प्रस्तावात चीनच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश न देण्याचाही उल्लेख आहे. जर चीननं दक्षिण चिनी समुद्रात स्काबरा शोआलमध्ये हालचालींना गती दिली, तर त्यांच्यावर अमेरिकेकडून आर्थिक निर्बंध लादले जातील, असंही प्रस्तावात म्हटलं आहे. मात्र चीननं या प्रस्तावावर टीका केली आहे.
(दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांची गस्त, चीन संतप्त)
गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावर अनेक देशांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता अमेरिकेच्या नौदलानं दक्षिण चिनी समुद्रात विमानवाहू जहाजांद्वारे गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच चीननं अमेरिकेच्या दक्षिण चिनी समुद्रातील टेहळणीला विरोध केला आहे. दक्षिण चीन समुद्रात आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेला दिला आहे.