ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 16 - रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात इसीसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी ठार झाल्याचं वृत्त आहे. रशियाने सिरियामधील रक्का येथे केलेल्या हवाई हल्ल्यात अबू बकर अल-बगदादी ठार झाला असल्याची माहिती आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाकडे ही माहिती उपलब्ध असून याची खातरजमा केली जात आहे. मे महिन्याच्या शेवटी रशियाने हा हवाई हल्ला केला होता. 
 
रशियाला इसीसच्या प्रमुखांची बैठक होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. यानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला अशी अधिकृत माहिती मंत्रालयाने आपल्या फेसबूक पेजवरुन दिली आहे.
 
"28 मे रोजी इसीसच्या प्रमुखांमध्ये होणा-या बैठकीची जागा आणि वेळ माहिती करुन घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यानंतर रात्री 12.30 ते 12.45 दरम्यान हवाई दलाने ज्या ठिकाणी बैठक सुरु होती त्या कमांड पॉईंटवर हवाई हल्ला केला", अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला इसीसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी देखील उपस्थित होता. या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे अशी माहिती आहे. ही माहिती तपासली जात आहे.
 
हल्ल्यात इसीसचे अनेकजण ठार झाले असल्याची माहिती आहे. जवळपास 30 फिल्ड कमांडर्स आणि 300 पर्सनल गार्ड ठार झाले असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे.