नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दाऊदची एकूण मालमत्ता ६.७ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या आसपास असून, त्यापैकी तब्बल ४ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ब्रिटनमध्ये टाच आणण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरे आहेत, त्यांची किंमत काही हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारने आर्थिक निर्बंधांसंबंधीच्या यादीमध्ये दाऊद इब्राहिमचा समावेश केला होता. या संदर्भात भारतानेही ब्रिटनला पूर्वीच आपला अहवाल सुपुर्द केला आहे.
गेल्या महिन्यात ब्रिटनकडून मालमत्ता गोठविण्याच्या संदर्भात काही जणांची यादी जारी करण्यात आली होती. त्यात दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील ३ मालमत्तांचाही उल्लेख होता. ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या यादीत, दाऊद पाकिस्तानातील ३ मालमत्तांचे पत्तेही देण्यात आले होते.
फोर्ब्स मासिकाने जगातील मोस्ट वाँटेड डॉन असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर एवढी असल्याचे म्हटले होते. दाऊद हा जगातील क्रमांक दोनचा सर्वाधिक श्रीमंत डॉन असल्याचे मानले जाते. त्याची भारतातही काही बेनामी मालमत्ता असल्याचे सांगण्यात येते. भारत, पाकिस्तान, ब्रिटन या देशांखेरीज दक्षिण आफ्रिकेत व अन्य काही छोट्या राष्ट्रांत त्याच्या मालमत्ता आहेत. (वृत्तसंस्था)

डॉनच्या पाकिस्तानातील मालमत्तांचे पत्ते
१ ) हाउस नं. ३७, मार्ग क्रमांक ३0, डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी, कराची.
२) नूराबाद, कराची, पाकिस्तान
३) व्हाइट हाउस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन, कराची.

आधीही आली होती टाच
दाऊदची अनेक अरब व मुस्लीम राष्ट्रांत गुंतवणूक, उद्योग व मालमत्ता आहे. संयुक्त अरब अमिरातीने या वर्षीच्या जानेवारी महिन्यात त्याच्या १५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.
एकूण संपत्ती ४५ हजार कोटी रुपये