ऑनलाइन लोकमत 

डालोरी, दि. १ -  नायजेरीयातील बोको हराम या क्रूर दहशतवादी संघटनेने शनिवारी रात्री मेडूगुरी येथील डालोरी गावावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलांसह ८६ जण ठार झाले. अतिरेक्यांनी डालोरी गाव आणि जवळ असलेल्या २५ हजार शरणार्थींच्या दोन तळावर हल्ला केला. बोको हरामच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले. 
गावातील घरांना आगी लावून लहान मुलांना जिवंत जाळले. जवळपास चार तास मुक्तपणे या दहशतवाद्यांचा हिंसाचार सुरु होता पण नायजेरीयन सुरक्षा पथकांकडून गावक-यांना कोणतीही मदत उपलब्ध झाली नाही. तीन आत्मघातकी महिला हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले. 
काही जणांनी झाडाझुडपाचा आश्रय घेऊन स्वत:चा जीव वाचवला. मेडूगुरीमध्ये लष्करी तळ असूनही लगेच मदत मिळाली नाही अशी तक्रार या हल्ल्यातून बचावलेल्या नागरीकांनी केली. बोको हरामने नायजेरीयात आतापर्यत केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात २० हजार नागरीक ठार झाले आहेत.