ब्रेक्झिटची आंधळी कोशिंबीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:02 AM2018-12-20T07:02:54+5:302018-12-20T07:03:22+5:30

ब्रिटनचे युरोपीयन युनियनमधून (यूयू) बाहेर पडणे (ब्रेक्झिट) हा एक मोठ्ठा विनोद झालाय. २९ मार्चला ब्रिटन बाहेर पडणार.

Blake salad of brazil | ब्रेक्झिटची आंधळी कोशिंबीर

ब्रेक्झिटची आंधळी कोशिंबीर

googlenewsNext

निळू दामले

ब्रिटनचे युरोपीयन युनियनमधून (यूयू) बाहेर पडणे (ब्रेक्झिट) हा एक मोठ्ठा विनोद झालाय. २९ मार्चला ब्रिटन बाहेर पडणार. बाहेर पडणार म्हणजे नेमके काय होणार? सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि मंत्री यांनाही नेमके काय घडणार आहे ते माहीत नाहीये. लोकसभेला आणि ब्रिटिश जनतेलाही यूयूच्या बाहेर पडण्याचे गौडबंगाल समजलेले नाहीये. थेरेसा मे युरोपीयन देशांचे उंबरठे झिजवून नेमके काय मागत आहेत, तेही कोणाला कळत नाहीये.

२0१६ साली सार्वमत घेऊन ब्रिटनने यूयूच्या बाहेर पडायचे ठरविले. ब्रिटनमध्ये येणारा माल आणि माणसे यांच्यावर बंधने घालावित असे ब्रिटनला वाटले. सीरियातल्या यादवीनंतर आशिया आणि मध्य आशियातून लक्षावधी माणसांचा लोंढा युरोपाकडे वळला. तशी माणसे हे लोढणे होईल, म्हणून ब्रिटनला टाळायची होती. यूयूमध्ये असलेल्या देशांनी आपसातल्या सीमा काढून टाकून माल व माणसांची वाहतूक मोकळी केली. हद्दीवरच्या जकाती आणि व्हिसे नष्ट झाल्याने व्यापार सुलभ झाला, त्या देशांचा खूप फायदा झाला, पण ब्रिटिश जनतेला वाटले की, या तरतुदी जकाती काढण्यातून ब्रिटिशांची निर्यात कमी होतेय, आयात वाढतेय आणि एकूण तोटा होतोय, असे ब्रिटिश जनतेला वाटले. त्यातूनच यूयूतून बाहेर पडायचा निर्णय झाला.
यूयूतून बाहेर पडल्यावर जागतिक बाजार संघटना नियमांनुसार जगाशी आणि यूयूतल्या युरोपीयन देशांशी स्वतंत्रपणे आपल्या फायद्याचे करार आपण करू शकू, असे ब्रिटनला वाटले, परंतु यूयू त्याला परवानगी देईल की नाही, यूयूतून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या नव्या सीमा कशा असतील, त्यावर यूयूचे काय मत असेल, याचा विचार ब्रिटनने केला नव्हता. पश्चिमी देशात नवरा-बायको जितक्या झटकन काडीमोड घेतात, तितक्या पटकन आणि सुलभ बाहेर पडू, असे ब्रिटिशाना वाटले होते, पण प्रत्यक्ष करार कागदावर उतरवायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आले की मामला वाटतो, तितका सोपा नाहीये.
आयर्लंड हा देश स्वतंत्र आहे आणि त्याला यूयूमध्ये राहायचेय. मग आयर्लंड आणि ब्रिटन यांच्यामध्ये सध्या अस्तित्वात नसलेले जकात नाके आणि पोलीस चौक्या नव्याने बसवायच्या का? आयर्लंड आणि उत्तर आयर्लंड यांच्यामधल्या सीमा त्या दोन विभागांमध्ये १९९८ साली झालेल्या करारानंतर पुसून टाकल्या होत्या, त्या दोन भागात मुक्तपणे माणसे व माल जाऊ शकतो. आता त्यांच्यामध्ये जकात नाके उभारायचे काय?

आयर्लंड आणि उत्तर आयर्लंड दोन्ही भाग याला तयार नाहीत. कारण तसे केले, तर त्यांच्यातला सलोखा आणि मुक्त व्यापार संपेल, दोन्ही विभागांचे नुकसान होईल. आयर्लंड हा देश युकेतून फुटून स्वतंत्र झाला, तेव्हा त्या देशातल्या उत्तरेचा काही भाग मात्र युकेमध्येच, ब्रिटनमधेच राहिला. कारण उत्तर आयर्लंड या भागात प्रोटेस्टंट (बहुसंख्य ब्रिटिशांसारखे) होते आणि आयर्लंडमध्ये कॅथलिक होते. या दोन पंथामध्ये प्रचंड वैर होते आणि तीसएक वर्षे हे दोन्ही भाग एकमेकांच्या विरोधात प्रचंड हिंसक आंदोलन चालवित होते. १९९८ साली एक करार करून ही हिंसा दोन्ही गटांनी थांबविली होती. आता पुन्ही ती सुरू होईल, अशी भीती आयर्लंडच्या दोन्ही गटांच्या लोकांना वाटतेय.
यूयूमधून बोटीने आणि विमानाने प्रचंड माल ब्रिटनमध्ये येतो. ब्रिटन यूयूत असल्याने ही वाहतूक सुलभपणे होत होती. आता जकात नाके येणार. दक्षिण युरोपातली फळे आणि भाज्या थंडीच्या मोसमात ब्रिटनमध्ये येतात. जकात नाका बसविला की बंदरात आणि विमानतळावर ट्रक आणि विमाने अडवून ठेवली जातील, तपासणी होईल, चिठ्ठ्या फाडल्या जातील, जकातीची आकारणी होईल आणि त्यात कित्येत तास गेल्यानंतर भाजी आणि फळे ब्रिटनमध्ये पोहोचणार. ते सारे खराब होण्याची शक्यता आणि नव्याने जकात लागल्याने ब्रिटिश ग्राहकाला ते महागात पडणार.

युरोपीय माणसे ब्रिटनमध्ये येत, ब्रिटिश माणसे युरोपात जात. गेली वीसएक वर्षे युरोप आणि ब्रिटिश सुखात नांदत होते. दोन्ही देशांचे आर्थिक आणि सामाजिक व्यवहार सुखात चालले होते. आता प्रवेश कोणाला द्यायचा, ते ब्रिटिश ठरविणार आणि युरोपीयन देश ठरविणार. आता युरोपीय माणसाला व्हिजा काढावा लागणार, पैसे द्यावे लागणार, तेच ब्रिटिशांचेही होणार. दोघांनाही आधी आपोआप मिळणारे नागरी अधिकार आणि स्वातंत्र्य आता नाहिसे होणार. याचा परिणाम दोन्ही देशांच्या सामाजिक आर्थिक स्थितीवर होणार.
ब्रिटनमध्ये वास्तवाला असलेल्या किंवा वास्तव्याला येणाऱ्या युरोपीय लोकांचे अधिकार व सवलती कोणत्या असतील ते ठरलेले नाहीये. युरोपमधल्या ब्रिटिशांचेही कोणते अधिकार असतील, ते ब्रिटनला माहीत नाहीये. कोणत्या करारानुसार ब्रिटन बाहेर पडणार? करारच न होता यूयूमध्ये राहणार? करारच न होता बाहेर पडणार? काहीही माहीत नाहीये. ना थेरेसा मे ना, ना खासदारांना ना मंत्र्यांना. थेरेसा मे वेड्यागत युरोपात फिरत आहेत. समोरचा प्राणी रेडा आहे की म्हैस आहे, ते माहीत नसताना जनता दुधाची अपेक्षा करत उभी आहे.


(लेखक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत)

Web Title: Blake salad of brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.