संयुक्त राष्ट्र - गेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.  अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्‍त सैन्‍य सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनचा पारा चढलाय त्यामुळे येथील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, अणुयुद्धाला कोणत्याही क्षणी सुरूवात होऊ शकते असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे. 

अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्‍त सैन्‍य सरावामुळे उत्तर कोरियाचा चांगलाच संताप झालाय. त्यांनी अमेरिकेचं कॅरिबियाई क्षेत्र गुआम येथे मिसाइल हल्ला करण्याची पुन्हा धमकी दिली आहे. ब्‍लूमबर्गच्या वृत्तानुसार, आमचा देश संपूर्णपणे अणू संपन्न झालाय आणि अमेरिकेचा संपूर्ण मुख्य भूभाग आमच्या फायरिंग रेंजमध्ये आहे अशी प्रकारचा इशारा संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे उप-उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी सोमवारी दिला.  

उत्तर कोरिया एक जबाबदार अणू देश असल्याचं प्रमाणपत्रंही त्यांनी देऊन टाकलं. याशिवाय उत्तर कोरियाविरोधात अमेरिकी सैन्यासोबत कोणत्याही देशाने सराव करू नये अशी धमकीही त्यांनी दिली. इतर कोणत्या देशाविरोधात अणू हल्ला करण्याचा अथवा धमकी देण्याचा आमचा प्रयत्न नसल्याचंही ते म्हणाले. 

उत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही- चीन
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील धमक्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली आहे. जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं आहे.

विशेष म्हणजे उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांच्या इशा-यानंतर चीननं विधान केलं आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, ट्रम्प यांच्या विधानवरून त्यांनी युद्धाची घोषणा केली असून, उत्तर कोरिया या युद्धाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्यानंतर चीननंही या वादात युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. अमेरिका व उत्तर कोरियाचे राजकर्त्यांना कदाचित हे माहिती असेल की, सैन्याच्या माध्यमातून युद्ध करणं ही व्यवहार्य पद्धत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त लू कांग म्हणाले आहेत.

उत्तर कोरियाच्या विदेश मंत्र्यांच्या विधानानंतर व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव साराह सेंडर्स यांनीही नवं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या पत्रकात अमेरिकेनं कोणत्याही पद्धतीच्या युद्धाची घोषणा केली नाही, उत्तर कोरियाचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री रि योंग हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचा उल्लेख रॉकेटमॅन असा केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या दिशेने रॉकेट सोडणे अनिवार्य झाले होते. दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर आम्ही अणुऊर्जा निर्मिती करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर निर्बंध घातल्याने आमच्या भूमिकेत बदल होईल असे मानणे चुकीचे ठरेल." गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकी वायूसेनेची बी-1बी ही बॉम्बवाहू विमाने उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरून घिरट्या घालून गेली होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अधिकचे निर्बंध घातले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली. ‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’ यानंतर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि यांग हो यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. यांग हो यांनी न्यू यॉर्क येथे युनायटेड नेशनच्या मुख्यालयाजवळ मीडियाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. यामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.