अमेरिकेचा पाकला आणखी एक दणका! सुरक्षा सहाय्यही थांबवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:48 AM2018-01-05T01:48:18+5:302018-01-05T09:16:23+5:30

दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी अमेरिकने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे.

 America's more bunker! Some more restrictions, the idea of ​​avoiding all help | अमेरिकेचा पाकला आणखी एक दणका! सुरक्षा सहाय्यही थांबवण्याचा निर्णय

अमेरिकेचा पाकला आणखी एक दणका! सुरक्षा सहाय्यही थांबवण्याचा निर्णय

Next

वॉशिंग्टन - दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी अमेरिकने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली.  'पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकी नागरिकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकिस्तानला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल', असेही हीथर नोर्ट यांनी सांगितले.
 

अमेरिकेनं दिला होता इशारा

व्हाइट हाउसच्या प्रसारमाध्यम सचिव साराह सँडर्स यांनी सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी पाकने आणखी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे पाकवर दबाव वाढविण्यासाठी अमेरिका आणखी निर्बंध लादणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत अमेरिकेने पाकला केलेली ३३ अब्ज डॉलरची मदत हा मूर्खपणा होता. या काळात पाक मात्र अमेरिकेशी खोटेपणाने व कपटी वृत्तीने वागला, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेने पाकची २५५ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत रोखली आहे.  



 





आमच्या भूमीवरून ५७८०० हल्ले - पाक

पाकिस्तानच्या तळांवरून अमेरिकी फौजांनी आजवर अफगाणिस्तानवर ५७,८०० हल्ले चढविले. अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धात असंख्य पाकिस्तानी नागरिक व सैनिकांनी जीव गमावला. पाकने अमेरिकेसाठी काय केले म्हणून तुम्ही कसे विचारता, अशा शब्दांत पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ यांनी अमेरिकेवर आगपाखड केली आहे.

अमेरिकेने मर्यादा ओलांडल्या - इराण

इराणमध्ये सरकारच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या निदर्शकांना पाठिंबा जाहीर करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय संबंधांतील सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे, अशी टीका इराणने केली आहे. ट्रम्प यांच्या टिष्ट्वटमुळे इराणमधील परिस्थिती आणखी चिघळली, असाही आरोप इराणने केला. इराणचे राजदूत गुलामअली खुश्रू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष व संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेरेस यांना पत्र लिहून, अंतर्गत बाबींमध्ये अमेरिका हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही केला आहे.

Web Title:  America's more bunker! Some more restrictions, the idea of ​​avoiding all help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.