‘अफगाणिस्तानात राहणे अशक्य’, शीख समुदाय भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:44 AM2018-07-03T02:44:25+5:302018-07-03T02:44:38+5:30

‘इस्लामी स्टेट’च्या (इसिस) अतिरेक्यांनी रविवारी जलालाबाद शहरात घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात १३ आप्तेष्ट ठार झाल्यावर संख्येने आधीच रोडावलेल्या शिख समुदायाची ‘आता अफगाणिस्तानात राहणे अशक्य’ असल्याची भावना दृढ होत आहे.

'Afghanism is impossible', Sikh community fears | ‘अफगाणिस्तानात राहणे अशक्य’, शीख समुदाय भयभीत

‘अफगाणिस्तानात राहणे अशक्य’, शीख समुदाय भयभीत

Next

काबुल : ‘इस्लामी स्टेट’च्या (इसिस) अतिरेक्यांनी रविवारी जलालाबाद शहरात घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात १३ आप्तेष्ट ठार झाल्यावर संख्येने आधीच रोडावलेल्या शिख समुदायाची ‘आता अफगाणिस्तानात राहणे अशक्य’ असल्याची भावना दृढ होत आहे. रोजचा दिवस जीव मुठीत धरून जगणारे हे लोक भारताच्या आश्रयाला जाण्याच्या विचारात आहेत.
भारताच्या मदतीतून बांधलेल्या एका इस्पितळाच्या उदघाटनासाठी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारी जलालाबादमध्ये गेले होते. त्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या बव्हंशी अल्पसंख्य समाजातील लोकांची बस ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी उडवून दिली. त्यात येत्या आॅक्टोबरमध्ये होणाºया संसदीय निवडणुकीतील एक उमेदवार अवतार सिंग खालसा व आणखी एक सामाजिक नेते रावैल सिंग यांच्यासह शिख समुदायातील १३ व्यक्ती ठार झाल्या होत्या. या भीषण हत्याकांडानंतर ‘आता आम्हाला येथे राहणे शक्य नाही’, असे सांगून अवतार सिंग यांचे पुतणे व हिंदू व शिखांच्या राष्ट्रीय समितीचे सचिव तेजवीर सिंग यांनी भयभीत शिख समुदायाच्या मनातील कमालीची असुरक्षितता व्यक्त केली. जलालाबाद घटनेनंतर काही शिखांनी काबुलमधील भारतीय वकिलातीमध्ये आश्रय घेतला आहे. मृतांना भारतात नेऊन तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी भारताने दर्शविली. पण १३ पैकी आठ मृतांवर जलालाबादमध्येच कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.
तेजवीर सिंग म्हणाले, आम्ही अफगाण नागरिक आहोत व सरकारही आम्हाला पूर्ण नागरिकच मानते. परंतु आम्ही मुस्लिम नाही म्हणून इस्लामी अतिरेकी आम्हाला येथे आमच्या धर्माचे पालन करू देणार नाहीत, हे उघड आहे. जलालाबादमध्ये कापड व पुस्तकांचे दुकान चालविणारे बलदेव सिंग म्हणाले की, आता आमच्यापुढे दोनच पर्याय शिल्लक आहेत. एक तर येथेच राहण्यासाठी धर्मांतर करून मुस्लिम व्हायचे किंवा भारतात जायचे.
मात्र ज्यांचे भारतात आता नातेसंबंध नाहीत व येथेच उद्योग-व्यवसाय आहेत, अशा काही मोजक्या शिखांचा काहीही झाले तरी अफगाणिस्तानातच राहण्याचा निर्धार आहे. त्यांच्यापैकीच एक, काबुलमधील दुकानदार संदीप सिंग म्हणाले, ‘आम्ही अफगाण नागरिक आहोत. भीतीमुळे आम्ही दुसरीकडे कुठेही जाणार नाही.’
जलालाबादमधील हत्या हा अफगाणिस्तानच्या संमिश्र संस्कृतीवर आघात आहे, असे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध नोंदविला. येथील अल्पसंख्य समाजाच्या सुरक्षेचा ते विशेष बैठक घेऊन आढावाही घेणार आहेत.
अफगाणिस्तान हा भारताचा फार जुना व सच्चा मित्र आहे. यादवीनंतर झालेल्या विनाशातून सावरण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मोठी मदत केली. एवढेच नव्हे तर भारत तेथे
अनेक पायाभूत सुविधाही उभारून
देत आहे. मात्र तरीही भारतीय हे
येथील इस्लामी अतिरेक्यांचे लक्ष्य ठरत आहेत. उत्तरेकडील बागलान प्रांतातून मेममध्ये अपहरण केलेल्या सात भारतीय अभियंत्यांची सुटका करणे दोन्ही सरकारांना अद्याप जमलेले नाही. (वृत्तसंस्था)

अत्यल्प संख्येचा समाज
बहुसंख्य मुस्लीम असलेल्या अफगाणिस्तानात
शीख समुदायाची संख्या अत्यल्प आहे.
१९९० च्या दशकातील विनाशकारी यादवीपूर्वी अफगाणिस्तानमधील शीख व हिंदूंची संख्या २.५० लाख होती.
त्यानंतर, हजारोंनी देश सोडून भारताचा आश्रय घेतल्याने पुढील १० वर्षांत ही संख्या तीन हजारांवर आली.
आता येथे जेमतेम ३०० शिख कुटुंबे आहेत. त्यांच्यासाठी काबूल व जलालाबाद येथे फक्त दोन गुरुद्वारा आहेत.

भारताचे दरवाजे खुले
छळाला कंटाळलेल्या व जीव धोक्यात असलेल्या शेजारी देशांतील हिंदू, शिख व बौद्ध नागरिक येथे आल्यास, भारत त्यांना दीर्घकालीन वास्तव्याचा व्हिसा देतो. त्यांना भारतीय नागरिकत्व सुलभ करण्याचा कायदाही अलीकडेच करण्यात आला आहे.
जलालाबाद घटनेनंतर भारताचे काबूलमधील राजदूत विनय कुमार म्हणाले, येथील शीख भारतात येऊन हवा तेवढा काळ राहू शकतात. अर्थात, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. भारत सरकार त्यांना हरतºहेची मदत करायला तयार आहे.

Web Title: 'Afghanism is impossible', Sikh community fears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.