चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे इतर पराक्रमही करतील थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:47 PM2019-07-20T12:47:53+5:302019-07-20T12:58:07+5:30

आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते.

50th Anniversary of Moon Landing: How Neil Armstrong was Selected for the Apollo 11 Mission | चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे इतर पराक्रमही करतील थक्क!

चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे इतर पराक्रमही करतील थक्क!

googlenewsNext
ठळक मुद्देअंतराळवीर बनण्याआधी आर्मस्ट्राँग नौदलात होते.आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते.१९६२ मध्ये अंतराळ प्रवासाला जाण्याची संभावना असलेल्या सात पायलटमध्ये आर्मस्ट्राँग यांचा समावेश करण्यात आला.

२० जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्राँग यांच्या नावाची इतिहासात नोंद आहे. पण, अंतराळवीर बनण्याआधी आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते.

नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी ९०० पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले. आर्मस्ट्राँग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यानही अंतराळ प्रवास केलेला होता. त्यांचे वडील स्टीफन हे ओहायो येथे सरकारी अंकेक्षक होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ओहायोच्या अनेक भागांमध्ये भ्रमण करीत होते. नील यांच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांची किमान २० ठिकाणी बदली झाली होती. याच काळात नील यांना हवाई उड्डाणाचे वेड लागले. आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ विमान उडविण्याचा परवानाही नव्हता.

आर्मस्ट्राँग यांना २६ जानेवारी १९४९ रोजी नौदलाकडून नियुक्ती पत्र मिळाले आणि त्यांनी पेंसाकोला नेवी एअर स्टेशनमध्ये १८ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या २० व्या वर्षीय त्यांना नौदल पायलटचा दर्जा मिळाला. त्यानंतर त्यांना सॅन डिएगो येथील फ्लीट एअरक्राफ्ट सर्विस स्क्वाड्रन-७ मध्ये नियुक्त केले गेले. ३ सप्टेंबर १९५१ रोजी त्यांना पहिल्यांदा सशस्त्र उड्डाण करावे लागले. कोरिया युद्धातील ७८ मिशनदरम्यान १२१ तासांचे उड्डाण केले आणि या युद्धकाळात त्यांना पहिल्या २० मिशनसाठी एअर मेडल, पुढच्या २० मिशनसाठी गोल्ड स्टार आणि कोरियन सर्व्हिस मेडल देऊन गौरविले. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी नौदलाचा राजीनामा दिला आणि संयुक्त राज्य नौदल रिझर्व्हमध्ये २३ ऑगस्ट १९५२ रोजी ते लेफ्टनंट (ज्युनिअर ग्रेड) पदावर रुजू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर १९६० मध्ये सेवानिवृत्त झाले.

यादरम्यान आर्मस्ट्राँग यांची अमेरिकन वायुदलातर्फे 'मॅन इन स्पेस सूनसेट' कार्यक्रमासाठी निवड झाली. त्यांना १९६० च्या नोव्हेंबरमध्ये एक्स-२० डायनासोरचे टेस्ट पायलट म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर १९६२ मध्ये अंतराळ प्रवासाला जाण्याची संभावना असलेल्या सात पायलटमध्ये आर्मस्ट्राँग यांचा समावेश करण्यात आला. त्या वेळी अंतराळ यानाचे डिझाईन तयार होत होते.

२० सप्टेंबर १९६५ रोजी 'जेमिनी-८' अंतराळ यानाच्या चालक दलाची घोषणा करण्यात आली आणि नील आर्मस्ट्राँग यांना या चालक दलाचे कमांड पायलट तर डेव्हिड स्कॉट यांना पायलट बनविले गेले. हे मिशन १६ मार्च १९६६ रोजी लाँच करण्यात आले. हे त्या काळातील सर्वांत जटिल असे मिशन होते, ज्यात 'एजेना' हे मानवरहित अंतराळ यान आधीच प्रक्षेपित केले जाणार होते. नील आर्मस्ट्राँग आणि स्कॉट ज्यात बसलेले होते त्या 'टायटन-२'मधून 'एजेना'ला अंतराळात सोडले जाणार होते. कक्षेत पोहोचल्याच्या सहा तासांनंतर दोन्ही यानांना परस्परांशी जोडले. यादरम्यान तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तो दूर करण्यात अपयश आल्याबद्दल आर्मस्ट्राँग यांच्यावर टीकाही झाली. परंतु जसे प्रशिक्षण देण्यात आले होते, तसेच आर्मस्ट्राँग यांनी केले, असा खुलासा एअरफोर्सने केला. या मोहिमेचा कालावधी कमी करण्यात आला आणि आर्मस्ट्राँग नैराश्यग्रस्त झाले. परंतु त्यांना पुन्हा एकदा मालिकेच्या 'जेमिनी-११' मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. या वेळी ते कमांड बॅकअप पायलट बनले.

१९६६ मध्ये पीट कोनरॉड आणि डिक गार्डन यांची या मोहिमेत मुख्य भूमिका होती आणि आर्मस्ट्राँग कम्युनिकेटर बनले होते. ही मोहीम निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी ठरली. नील आर्मस्ट्राँग यांनी 'अपोलो-८'मध्ये काम केले असल्याकारणाने त्यांना डिसेंबर १९६८ मध्ये 'अपोलो-११'चा कमांडर बनण्याचा प्रस्ताव मिळाला आणि त्यानंतर जे काही घडले ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.





 

Web Title: 50th Anniversary of Moon Landing: How Neil Armstrong was Selected for the Apollo 11 Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.