इंडोनेशियात निवडणूक कामाच्या ताणामुळे २७२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:36 AM2019-04-29T02:36:39+5:302019-04-29T06:20:17+5:30

एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे झेपले नाही; १८७८ जण पडले आजारी

272 employees die in Indonesia due to work stress | इंडोनेशियात निवडणूक कामाच्या ताणामुळे २७२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

इंडोनेशियात निवडणूक कामाच्या ताणामुळे २७२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

googlenewsNext

जकार्ता : इंडोनेशियामध्ये अलीकडेच राष्ट्राध्यक्ष, संसद, प्रांतिक विधिमंडळांचे सदस्य निवडण्यासाठी एकाच दिवशी मतदान होऊन मतमोजणीही लगेच घेण्यात आली होती. निवडणुकांतील या अतिकामाच्या ताणामुळे तेथील २७२ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला व १८७८ जण आजारी पडले आहेत. पहिल्यांदाच सर्व निवडणुका एकत्र घेणे, त्याची मोजणी लगेच करणे, यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला. इंडोनेशियात मतदान ईव्हीएमद्वारे नाही तर मतपत्रिकांवर केले जाते.

२६ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये एकाच दिवशी सर्व निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ होती. १७ एप्रिल रोजी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये १९.३ कोटी मतदारांपैकी ८० टक्के लोकांनी मतदान केले. ८ लाख मतदान केंद्रांवर प्रत्येक मतदाराने सर्व निवडणुकांसाठी पाच स्वतंत्र मतपत्रिकांद्वारे आपला हक्क बजावला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ तासांच्या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. या अतिकामाचा ताण आल्याने शनिवारी रात्रीपर्यंत २७२ निवडणूककर्मचारी मरण पावले.

इंडोनेशियातील निवडणुकीतील विरोधी पक्षाचे उमेदवार प्राबोवो सुबिआंतो यांच्या प्रचार मोहिमेचे उपप्रमुख अहमद मुझानी यांनी म्हटले आहे की, इंडोनेशियामध्ये एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याचे आव्हान सार्वत्रिक निवडणूक आयोगाला पेलवले नाही. विद्यमान राष्ट्राध्यक्ष व पुन्हा या पदासाठी निवडणूक लढवीत असलेले जोको विदोदो यांच्या हस्तकांनी मतमोजणीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप प्राबोवो यांनी केला होता. विदोदो हे जिंकले असल्याचा प्राथमिक अंदाज असून निकाल २२ मे रोजी आहे. 

भरपाईबाबत लवकरच घोषणा
नवडणूक प्रक्रियेतील कामांमुळे आजारी पडलेल्या कर्मचाºयांना उत्तम उपचार मिळावेत म्हणून उपाययोजना करण्याच्या सूचना इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रशासनाला दिल्या आहेत. मरण पावलेल्या तसेच आजारी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना भरपाई देण्याबाबत वित्त मंत्रालय लवकरच घोषणा करणार आहे.

Web Title: 272 employees die in Indonesia due to work stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.