कराची, दि. 13 - पाकिस्तानमधील क्वेटामध्ये सुरक्षा रक्षकांच्या ट्रकला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा येथील हाय सेक्युरिटी असलेल्या परिसरातील पिशिन बस स्टॉपजवळ हा बॉम्बस्फोट करण्यात आला. बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराज बुगती यांनी सांगितले की, गस्त घालणा-या सुरक्षा रक्षकांच्या ट्रकला निशाना साधत दहशतवाद्यांनी आत्मघाती  बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्यांना जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांपैकी सहा ते सात जण गंभीर आहेत. तसेच, घटनास्थळी पोलिस आणि बॉम्बशोधक-नाशक पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील चार मांग जिल्ह्यातील बजोर येथे दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या बॉम्बस्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 26 जण जखमी झाले आहेत. येथील अधिका-यांच्या माहितीनुसार, चार मांग जिल्ह्यातील मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांनी बजोरमध्ये मजुरांना घेऊन जाणा-या वाहन रस्त्यावर आयईडी बॉम्बस्फोट घडवून उडवून दिली.