पाकमध्ये १४ जणांची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:14 AM2019-04-19T04:14:15+5:302019-04-19T04:14:29+5:30

पाकिस्तानात निमलष्करी दल जवानांच्या गणवेशात आलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केली.

 14 people shot dead in Pakistan | पाकमध्ये १४ जणांची गोळ्या घालून हत्या

पाकमध्ये १४ जणांची गोळ्या घालून हत्या

Next

इस्लामाबाद/कराची : पाकिस्तानात निमलष्करी दल जवानांच्या गणवेशात आलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केली. मृतांत पाकिस्तानच्या नौदलाचा कर्मचारी आहे. हिंसाचाराने अस्वस्थ असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील ओरमारा भागातील मकरान कोस्टल महामार्गावर १५-२० जणांच्या सशस्त्र टोळीने कराची आणि ग्वादारदरम्यान प्रवास करीत असलेल्या पाच ते सहा बस अडवून तीन डझन प्रवाशांची ओळखपत्रे तपासली व त्यातील १६ जणांना उतरवून घेण्यात आले. त्यातील १४ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले व दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले, असे पोलिसांनी सांगितले.
बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक मोहसीन हस्सन बट्ट यांनी हे हत्याकांड बुझी टॉप भागात पहाटे झाल्याचे सांगितले. बसमधील प्रवाशांची नियमित तपासणी होते. त्यामुळे हल्लेखोरांनी निमलष्करी दलाच्या जवानांचा गणवेश घालून या हत्या केल्या, असे बलुचिस्तानचे गृहमंत्री झिया लँगोव्ह यांनी
सांगितले.
ते म्हणाले, मृतांची ओळख पटलेली नाही. आम्ही हल्लेखोरांचा शोध घेत असून, चौकशी सुरू केली आहे. मृतांमध्ये नौदलाचा एक व किनारारक्षक दलाचा एक कर्मचारी मरण पावल्याचे लँगगोव्ह म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे. हत्याकांडाचा उद्देश स्पष्ट झालेला नाही, तसेच अजून कोणत्याही गटाने या हत्याकांडाची जबाबदारीही घेतलेली नाही. 
>अस्वस्थ बलुचिस्तान
बलुचिस्तान हा इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असून, तो पाकिस्तानचा सगळ्यात मोठा व गरीब प्रांतांपैकी एक आहे. बलुचिस्तान वांशिक, फुटीरवादी बंडखोरी आणि कट्टर विचारांनी त्रस्त आहे. देशातील अल्पसंख्य शिया मुस्लिम आणि पंजाब प्रांतातील वांशिक कार्यकर्ते यांना याआधी अगदी ठरवून ठार मारण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात इसिसने क्वेट्टाच्या प्रांतीय राजधानीत हाजरा शिया समूहाला लक्ष्य करून २१ जणांना ठार मारले होते. या हल्ल्यात ६० जण जखमीही झाले होते. २०१५ मध्ये बलुचिस्तानच्या मात्सुंग भागात सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी कराचीला निघालेल्या रेल्वेच्या दोन डब्यांतून दोन डझन प्रवाशांचे अपहरण करून त्यातील १९ जणांची खाद कोचा या डोंगराळ भागात हत्या केली.

Web Title:  14 people shot dead in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.