ऑनलाइन टीम
जिनिव्हा, दि. १९ - इबोला या रोगामुळे आफ्रिका खंडातील विविध देशांमध्ये आत्तापर्यंत १२०० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागल्याची माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिली आहे. भारतात अद्याप या रोगाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही.
गिनी, लायबेरीया, नायजेरीया आणि सिरा लिओन या देशांमधील एकुण २२४० लोकांना इबोलाची लागण झाली आहे. तसेच या रोगामुळे आत्तापर्यंत १२२९ जण मृत्यूमुखी पडले आहेत. १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान ११३ नवीन रुग्ण सापडले असून त्यापैकी ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. या बाबात अधिक खबरदारीचा उपाय म्हणून इबोलाची बाधा असलेल्या क्षेत्रात लोकांनी जाणे टाळावे असे आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केले आहे.
रक्त तसेच शरीरातून निघणा-या द्रव पदार्थाशी संपर्क आल्यास हा रोग होतो असे तज्ञांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या रोगावर अजूनही कोणताच ठोस उपाय सापडलेला नसून वैज्ञानिक या रोगाचा अधिक अभ्यास करत आहेत.