Hockey World Cup 2018: New Zealand's beat france by 2-1 margin | Hockey World Cup 2018 : न्यूझीलंडची विजयी सलामी, फ्रान्सचा उत्तम खेळ
Hockey World Cup 2018 : न्यूझीलंडची विजयी सलामी, फ्रान्सचा उत्तम खेळ

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : फ्रान्स आणि न्यूझीलंड हे उभय संघ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले. क्रमवारीत आघाडीवर असलेल्या न्यूझीलंडने अपेक्षेप्रमाणे खेळ करताना 'A' गटातील या सामन्यात 2-1 अशी बाजी मारली. 2013 नंतर या संघांमधील ही तिसरी आंतरराष्ट्रीय लढत होती आणि त्यात न्यूझीलंडने विजय मिळवून जय-पराजयाची आकडेवारी 2-0 अशी केली. उभय संघातील एक सामना बरोबरीत सुटला होता. 

न्यूझीलंड आणि फ्रान्स यांनी बचावात्मक खेळावर भर ठेवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर न्यूझीलंडने 17व्या मिनिटाला खाते उघडले. केन रसेलने अप्रतिम मैदानी गोल करताना संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेंडूवर ताबा ठेवताना न्यूझीलंडने सावध खेळावरच भर दिला. फ्रान्सकडून आक्रमक खेळ झाला, परंतु त्यांच्या वाट्याला यश येत नव्हते. मात्र, त्यांनी न्यूझीलंडलाही 1-0 अशा फरकावरच बराच काळ रोखले होते.न्यूझीलंडला दुसरा गोल करण्यासाठी अखेरच्या सत्रापर्यंत वाट पाहावी लागली. स्टीफन जेनेसने ( 56 मि.) मैदानी गोल करताना न्यूझीलंडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिला. मात्र, 59 व्या मिनिटाला फ्रान्सने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्हिक्टर चार्लेटने हा गोल केला. पण, फ्रान्सचा पराभव टाळण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही. 


 

 


Web Title: Hockey World Cup 2018: New Zealand's beat france by 2-1 margin
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.