हिंगोलीत ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:40 AM2018-09-14T00:40:41+5:302018-09-14T00:41:20+5:30

जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अशा मंगलमय वातावरणात मंगलमूर्तीचे आगमन झाले. गणेशाची स्थापना करण्यात आली.

 Welcome to 'Shree' in Hingoli | हिंगोलीत ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत

हिंगोलीत ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अशा मंगलमय वातावरणात मंगलमूर्तीचे आगमन झाले. गणेशाची स्थापना करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता.
हिंगोली शहरातील विविध भागात आज गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली. सकाळपासूनच बाजारपेठेत गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील मंडळांचीही दुपारपर्यंत मोठी गर्दी होती. ढोल-ताशे, वाहने आदींची गर्दी शहरातील गांधी चौक भागात झाली होती. त्याचबरोबर सजावटीच्या साहित्याचीही दुकाने थाटली होती. हातगाड्यांवरही हे साज विक्री केले जात होते. हार, फुले, थर्माकोलची सजावट, रेडिमेड सजावटीच्या कमानींनाही मोठी मागणी असल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर स्थानिक गणेश मंडळांचीही अशीच लगबग दिसून येत होती. दुपारनंतर तर शहरातील सर्वच रस्त्यांवर ढोल-ताशांच्या दणदणाटात गणपती मिरवणुका निघालेल्या दिसत होत्या. गणेशाचे बालभक्त श्री गणेशा देवा... च्या तालावर ठेका धरताना दिसत होते.
आज विविध भागातून आलेल्या गणेशभक्तांनी हजारावर मूर्ती खरेदी केल्या. एकाच दिवशी लाखोंची उलाढाल यामधून झाली. याशिवाय सजावटीच्या साहित्याचाही वेगळा बाजार फुलला होता. फळे, आघाडा, केना आदी साहित्यही विक्रीस आले होते.
विघ्नहर्ता गणपतीची पालखी
हिंगोली येथील गड्डेपीर गल्लीतील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक नियोजित शिवाजी महाराजांचा पुतळा येथून काढण्यात आली. तत्पूर्वी पुतळ्यानजीक पालखीची आरती करण्यात आली. यावेळी आ.तान्हाजीराव मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दिलीप बांगर, रमाकांत मिस्किन, मोतीराम इंगोले, उत्तमराव जगताप, प्रशांत सोनी, फुलाजी शिंदे, दुर्गादास साकळे आदींची उपस्थिती होती. ही मिरवणूक शहरातील पोस्ट आॅफिस रोड, जवाहर रोड, गांधी चौक, कपडा गल्ली मार्गे गड्डेपीर गल्लीत विसर्जित झाली. या मिरवणुकीत भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोडे, भजन पथकाचाही सहभाग होता.
मंडप उभारणी : आकर्षक सजावट
शहरातील विविध भागात गणेश मंडळांनी विविध प्रकारच्या देखाव्यांसह मंडप उभारणी केली. स्थापनेच्या दिवसापर्यंत अनेक गणेश मंडळांची मंडप उभारणीसह सजावटीची लगबग सुरू होती. मंदिराप्रमाणे आकर्षक मंडप उभारण्यात आले असून आज त्यावरही शेवटचा हात फिरविताना काही ठिकाणी गणेशभक्त
दिसून येत होते. मोठ्या मंडळांच्या मूर्तीसाठी सायंकाळी सहानंतर बाजारात गर्दी झाली होती. या मंडळांनी मिरवणुका काढून गणेश स्थापनेसाठी मूर्ती नेल्या. या मिरवणुकांमध्ये युवकांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्याचेही पहायला मिळाले.
या मिरवणुका पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. या गर्दीमुळे हा परिसर गजबजला होता. विविध भागांत श्रीगणेश स्थापना उत्साहात व शांततेत झाली. यानिमित्त अनेक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता.

Web Title:  Welcome to 'Shree' in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.