Wander for water persists | पाण्यासाठी भटकंती कायम
पाण्यासाठी भटकंती कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
लक्ष्मण नाईक तांडा : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.
लक्ष्मण नाईक तांडा हे १२०० लोकवस्तीचे गाव आहे. तांडयावर गत दोन महिन्यांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. येथे पंधरा वर्षापूर्वी २१ लाख खर्च करून जलस्वराज्य प्रकल्प योजनेतंर्गत नळ योजना सुरु केली होती. मात्र ही नळ योजनाही पाण्याअभावी बंद अवस्थेत आहे. सार्वजानिक पाणीपुरवठ्याची टाकीही शोभेची वास्तू बनली आहे. या योजनेसाठी दरवर्षी तीन ते चार लाखांचा निधी खर्च करण्यात येतो. तरीही ग्रामस्थांची भटकंती कायम आहे. लक्ष्मण नाईक तांडा हे गाव अतीदुर्गंम भागात वसलेले आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने तांडयावरील ग्रामस्थांना दोन कि.मी. अंतरावरील विहिरीतून जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. येथील सार्वजानिक विहिरीत पाच दिवसाआड पाणी सोडण्यात येते. एकाच दिवसात हे पाणी संपते. त्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांना दोन कि.मी. अंतरावरून पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. शाळेतील लहान मुलांना शाळा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावालगतच्या सिमेंटी बंधाऱ्यात गावातील घाण पाणी साचत असल्याने त्याच पाण्यावर गुरे आपली तहान भागवत आहेत. त्यामुळे गुरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुष्काळामुळे सारे चिंतित
४यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने या भागात जानेवारी महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. दुष्काळामुळे हाताला काम उपलब्ध नसल्याने येथून शेकडो शेतमजुरांचे स्थलांतर झाले आहे. जनावरे व शाळेतील मुलांना सांभाळण्यासाठी वृद्ध गावात शिल्लक आहेत. सार्वजानिक विहिरीवर कुणाला पाणी मिळते तर कुणाला मिळत नाही. अशी स्थिती उद्भवली आहे. पाण्याच्या स्पर्धेत वृद्धांना पाणी मिळत नाही. माय बाप सरकारने आता तरी लक्ष देवून टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.


Web Title:  Wander for water persists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.