Vasamat Municipality's primary health center running without medicines | वसमत नगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र चालते औषधीविना
वसमत नगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र चालते औषधीविना

वसमत (हिंगोली ) : शहरात नगरपालिकेतर्फे शुक्रवारपेठ भागात सुरु केलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र औषधीविनाच चालविले जात असल्याने गोर-गरीब  जनतेची मोठी अडचण झाली आहे. पालिका आरोग्य विभाग सुविधा पुरविण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. 

शासनाने गोरगरीब जनतेला आरोग्याच्या मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राष्ट्रीय शहरी अरोग्य अभियानांतर्गत पालिकेने सन २०१३-१४ यावर्षी शहरातील शुक्रवारपेठेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. परंतु काही काळानंतर हे केंद्र  अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बंद पडले. त्यानंतर मुख्याधिकारी अशोक साबळे, आरोग्यकेंद्र व्यवस्थापक मोहम्मद नवाज कुरेशी यांनी रुग्णालयास भेट दिली.

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना बजावून आरोग्य केंद्र नियमित चालवण्याचे आदेश दिले. त्यानंतर दररोज ४० ते ५० रुग्ण ‘ओपीडी’मध्ये प्राथमिक तपासणीसाठी येतात. परंतु आरोग्य केंद्रात रुग्णांना देण्यासाठी औषधीच उपलब्ध नसल्याने तपासणी करुन औषधांची चिठ्ठी रुग्णांच्या हातात दिली जाते. पालिका आरोग्य विभागाची ही बेजबाबदार वृत्ती शासनाच्या आरोग्य सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ औषधी पुरवठ्याची मागणी जनतेतून होत आहे.

रुग्णांची तपासणी करुन हातात देतात चिठ्ठी
शासनाच्या ई-टेंडरिंगमुळे कुठलेही औषध उपलब्ध करून देण्यात आले नाही. रोजमजुरी करून आपली उपजीविका भागवणाऱ्या अनेक कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी वरदान म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जाते. मात्र केवळ आरोग्य तपासणी करून औषधांची चिठ्ठी रुग्णांच्या हातात देण्याचेच काम येथे होत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असून रुग्णालयात कशासाठी जावे? असा संतप्त प्रश्न व्याकूळतेने रुग्ण विचारताना दिसत आहेत.

योजना नावालाच
एकीकडे केंद ्रसरकार आरोग्य योजनांचा ढिंडोरा पिटते तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधांपासून वंचित रहावे लागते. आरोग्याच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचतच नसल्याचे दिसत आहे.


Web Title: Vasamat Municipality's primary health center running without medicines
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.