कळमनुरी : हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डी मोड वळणावर आज सकाळी ४ वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात ४ जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी कि, ट्रक क्र. एमएच २६-२६ एडी ७०२२ हा हिंगोलीहून नांदेडकडे जात असताना समोरून नांदेडकडून येणा-या ट्रक क्र. एपी-०७ -टीबी-०२३५ या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या दोन वाहनातील मारोती रामा बोईनवाड (३०, रा. बोधरी बु. ता. किनवट), राजू अंकुश गुंडेवार (३५, कामठा ता. किनवट) व म. फेरोज, फुलाराव सोशलू (५०, रा. आंध्रप्रदेश) हे चार चालक क्लिनर गंभीर जखमी झाले. या चौघा जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती. पुढील तपास जमादार जनार्दन कपाटे, बालाजी जोगदंड हे करीत आहेत.
पार्डीमोडवर नेहमीच अपघात

हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डीमोड वळणावर नेहमीच अपघत होतात. सा.बा. विभागाने दोन्ही बाजूनी गतिरोधक बसविले आहे. छोटे गतिरोधक बसविल्याने वाहने भरधाव वेगाने जात आहेत. येथे दोन्ही बाजुंनी मोठे गतिरोधक बसविल्यास अपघात होण्याचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे.