Turning Closer Professional Troubleshooting | फिल्टरमुळे माठ व्यावसायिक अडचणीत
फिल्टरमुळे माठ व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटलीबंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावात पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे.
कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी मिळते शिवाय ते थंड करण्यासाठी घरातील फ्रीजचा मार्ग मोकळा असल्याने आजघडीला गरिबांचा फ्रीज समजला जाणाऱ्या माठाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येते. शहरातील कुंभार गल्लीत पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जातात. हे माठ बाजारात विक्रीसाठी आणले जातात. मात्र मागील काही वर्षापासून माठाच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला केवळ पाच ते दहा माठांची विक्री होते. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सवलतीच्या दरात फ्रीज तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल या आधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे औढा शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी आरओ प्लांट सुरू झाले आहे. काळानुसार या व्यवसायालाही चार चांद लागल्याचे दिसून येत आहे. सुमारे १० ते १५ ठिकाणी पाणी शुद्ध करून ते जारमध्ये भरून मिळते. वीस लिटर शुद्ध पाणी अवघ्या दहा ते वीस रुपयांना घरपोच मिळते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात माठाएवजी जारच दिसून येत आहेत. याशिवाय घरोघरी शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसवलेले आहेत. पूर्वी दीडशे रुपयांना मिळणारा माठ नागरिक दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोज जारच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी नागरिकांची असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम माठ विक्री व्यवसायावर झाला आहे. माठाला मागणी कमी होत असून व्यवसायावर मंदीचे सावट दिसून येत आहे.


Web Title:  Turning Closer Professional Troubleshooting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.