Steal again; Cash, mobile lamps | पुन्हा हिंगोलीत चोरी; रोकड, मोबाईल लंपास
पुन्हा हिंगोलीत चोरी; रोकड, मोबाईल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील आदर्श कॉलनी येथील रघुविरसिंग सेठी यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी हात घालून कडी खोलली व घरातील २३ हजार रोकड व भाडेकरूच्या खोलीतील मोबाईल असा २७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली शहरातील आदर्श कॉलनी येथील रघुसिंग जगजितसिंग सेठी यांच्या घरात चोरी झाल्याची घटना ८ फेबु्रवारी रोजी पहाटे ४ वाजेच्यादरम्यान घडली. चोरट्यांनी खिडकीतून हात घालून कडी खोलली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील पर्समध्ये ठेवलेली २३ हजारांची रोकड लांबविली. तसेच सेठी यांच्या भाडेकरूच्या खोलीतील मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. घरात चोरी झाल्याने याप्रकरणी सेठी यांनी हिंगोली शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ७ फेबु्रवारी रोजी शहरातील सरस्वतीनगर येथील श्रीराम तांबिले यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी डब्यातील ३३ हजार ४०० रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. आता ८ फेबु्रवारी रोजी परत चोरीची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे.


Web Title:  Steal again; Cash, mobile lamps
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.