Principal education in the murder case | खून खटल्यात मुख्याध्यापकास शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील जाधव यांची निर्दोष मुक्तता केली.
शिक्षण क्षेत्रात हा खून खटला मोठ्या प्रमाणात गाजला होता. तेव्हापासून निर्माण झालेले वाद आजतागायत सुरू आहेत. ८ नोव्हेंबर १९९८ रोजी पगाराच्या कारणावरून हिंगोली येथील नांदेड नाक्यावर दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापक भारत साळवे व तुकाराम पाटील यांनी संगनमताने संजय क्षीरसागर यांचा खून केल्याचा आरोप होता याप्रकरणी सहशिक्षक संजय टाकळगव्हाणकर यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन सुनावणी झाली. २००१ मध्ये अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने यात भारत नेमीनाथ साळवे यास खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तर तुकाराम पाटील यांना भादंविच्या क. ३२६ अन्वये ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात येथे भारत साळवे व तुकाराम पाटील यांनी वेगवेगळी अपील दाखल केली होती. सदर अपिलाची सुनावणी न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व न्यायमूर्ती ए.एम. ढवळे यांच्या खंडपीठासमोर झाली.
न्यायालयाने भारत साळवे यांची खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. पण खुनाच्या बाबतीत कलम ३०४ (१) अंतर्गत दोषी मानून ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा पूर्वी भोगलेल्या कारावासाच्या कालावधीत सुट न देता ठोठावली. तर २ लाख रुपये दंड हा मयत संजय क्षीरसागर यांच्या वारसाला द्यावा, असा आदेश दिला. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. अपिलार्थी यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. त्यास अ‍ॅड. गोविंद कुलकर्णी, अ‍ॅड. निर्मल दायमा, अ‍ॅड. कृणाल काळे यांनी सहकार्य केले. शासनाच्या वतीने अ‍ॅड. विशाल बडाख यांनी काम पाहिले.