वसमतमध्ये ओपन बारचे वाढतेय प्रस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:08 AM2018-07-02T01:08:29+5:302018-07-02T01:09:16+5:30

येथे सध्या मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, ओसाड इमारती वर्दळ नसलेली ठिकाणे व रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बारऐवजी ओपन बारवर तल्लफ भागवली जात आहे. व्यसन तर जडलयं मात्र खर्च परवडत नसल्याने दारुडे व व्यसनाधिनांनी हा ओपन बारचा पर्याय शोधून काढल्याचे चित्र आहे.

 Open Bar's rise in the open bars in Vasmat | वसमतमध्ये ओपन बारचे वाढतेय प्रस्थ

वसमतमध्ये ओपन बारचे वाढतेय प्रस्थ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथे सध्या मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, ओसाड इमारती वर्दळ नसलेली ठिकाणे व रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बारऐवजी ओपन बारवर तल्लफ भागवली जात आहे. व्यसन तर जडलयं मात्र खर्च परवडत नसल्याने दारुडे व व्यसनाधिनांनी हा ओपन बारचा पर्याय शोधून काढल्याचे चित्र आहे.
वसमत तालुक्यात दारु पिणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दारु विक्री दुकानावर तरुणांची गर्दी पाहता तरुण पिढी दारुच्या आहारी जास्त जात असल्याचे चिंताजनक चित्र आहे. दारु पिणे म्हणजे फॅशन व पुढारलेपणाचे लक्षण असल्याचा खोटा प्रचार वाढल्याने तरुणाई गोड गैरसमजाला भुलली जाऊन दारुच्या आहारी जात आहे.
वसमतमध्ये दारु विक्री केंद्रावर वाढलेल्या गर्दीत सर्वाधिक तरुणाईचाच भरणा पहावयास मिळतो. तरुण पिढी व्यसनाधिन होत असल्याची कुणालाही पर्वा नाही. दारु पिण्याचे व्यसन एवढे वाढले की, वसमतमधील दारु दुकानांबाहेरही अनेकजण रस्त्यावर दारू पिताना जराही कचरत नाहीत. दारु विक्री केंद्राशेजारील नाल्यांमध्ये पडलेला रिकाम्या पाणी पाऊच व रिकाम्या प्लास्टिक ग्लासचा खच पाहिला तर हा एक ओपन बारचाच प्रकार असल्याचे लक्षात येते. वसमत मधील जिल्हा परिषद मैदानावर तर दररोज रात्री दारू पिणाºयांच्या टोळ्या शेकडोच्या संख्येने दिसतात.
खेळासाठी वापरावयाचे जिल्हा परिषद शाळेचे मैदान दारुड्यांनी ओपन बार करून टाकले आहे. दररोज दिवस मावळला की व्यसनाधिनांचे गट मैदानावर दाखल होतात. सोबत दारुच्या बाटल्या, पाणी पाऊच व ‘यूज अ‍ॅन्ड थ्रो’चे ग्लास भरलेली कॅरीबॅग असते. चकना म्हणून पाच रुपयाला मिळणाºया पुड्याही असतात. स्वस्तात ‘सोय’, कुणी उठ म्हणेना, टिप देण्याची गरज नाही की, बारचा चार्जही द्यायची गरज नाही. असे अनेक फायदे या व्यसनाधिनांना होत आहेत. काही महाभाग तर सोबत मेनबत्त्याही आणतात व ‘कॅन्डल लाईट’ मध्ये ओपन बारचा आस्वाद घेवून आपली हौस भागवून घेतात.
रात्री जिल्हा परिषदेच्या मैदानावरील अंधारात मद्यपान करणाºयांच्या टोळ्यांचे विहंगम दृश्य पहावयास मिळते. मैदानावर टिमटिमते दिवे किंवा मोबाईलच्या बॅटºयाच्या मंद प्रकाशात चार- पाच वर्तुळाकार बसलेले अनेक गट आढळतात.
वसमतचे जिल्हा परिषद शाळेचे मैदान कदाचित राज्यातील सर्वात मोठे ओपन बारही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मैदानावर मुक्तपणे दारु पिण्याचा प्रकार होत असतो. सकाळी मैदानावर रिकाम्या बाटल्या व साहित्याचा खच पडलेला असतो.
याच मैदानावर असलेल्या नूतन शाळेच्या इमारतीच्या व्हरांड्यातही दारुड्यांची जत्रा भरलेली असते. अनेकजण तर वर्गखोल्यांमध्येही आपले बस्तान मांडतात. कित्येकवेळा शाळेच्या वर्गखोल्यांचे कुलूप तोडून वापर झाल्याचेही प्रकार घडतात. नगरपालिकेच्या मागच्या बाजूला असलेल्या आठवडी बाजारासाठी बांधलेल्या शेडमधील ओट्यांवरही दारुडे रात्री ओपन बारसारखे दारु पित बसत असल्याचे चित्र असते. अशा अनेक शासकीय कार्यालयांचा परिसर, मोकळ्या जागा, मैदाने, आडोसे, कमी वर्दळीचे ठिकाण हे दारुड्यांनी ओपन बार करून टाकलेले आहेत.
रात्री जसे मैदानावर ओपन बार असतात तसेच दिवसाही रस्त्याच्या कडेला झाडाखाली, कॅनॉलच्या काठावरील झाडाखालीही दारु पिणाºयांचे गटही आढळतात. मोकळ्या हवेत बसून दारु पिण्याची हौस भागवण्याची ही नवी पद्धत वसमतमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कधीकाळी गावाबाहेरील झाडाखाली अभ्यास करणारे विद्यार्थी असायचे. त्यांची जागा आता दारुड्यांनी घेतली आहे. उघड्यावर दारु पिण्यास कोणी अडवत नसल्याच्या कारणानेसुद्धा हा ओपन बार प्रकार वाढत असावा, ओपन बारचा प्रकार वाढण्यास बारमधील खर्च न परवडणे हे प्रमुख कारण समजले जात आहे. दारु पिण्याची सवय तर लागली. दररोज दारु पिल्याशिवाय चैन पडत नाही. दारु पिणारे मित्रही खुश ठेवायचे असतात. कमी खर्चात व्यसन व हौस भागवायची म्हणून मिळेल ती स्वस्तातील दारु व चकना घेवून ही ओपन बार मैफिल सुरू होते.
बारमध्ये चार मित्रांबरोबर गेले तर दारु महाग मिळतेच शिवाय मित्र मंडळीची फर्माईशही नाकारता येत नाही. शिवाय हलका ब्रॅन्ड मागवला तर ‘नाव’ कमी नावे ठेवण्याचे प्रकार होतात. त्यातून कितीही कमी किमतीची दारु अंधारात मोकळ्या मैदानावर पिली तर खर्चही वाचतो व नावही खराब होत नाही, असा समजही ओपन बार संस्कृती वाढीस कारणीभूत असावा.
एकंदरीत उघड्यावर दारु पिण्याची ही पद्धत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारास वेळीच पायबंद घालण्याची गरज व्यक्त होत आहे. यासाठी तरुणाईचे प्रबोधन करण्याचीही गरज आहे. याबाबत अनेक वयोवृद्धांनी चिंता व्यक्त केली. तरुण पिढीला रुळावर आणायचे कसे? हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
जिल्हा परिषद मैदानावर दररोज क्रिकेट, फुटबॉलच्या सरावासाठी युवा खेळाडू येत असतात. त्यांना खेळ सुरू करण्यापूर्वी दररोज अगोदर मैदानावरील दारुच्या बॉटल्या, पाऊच आदी गोळा करण्याचे काम करावे लागते. काही तळीराम दारुच्या बॉटल फोडून टाकतात, याचा आम्हाला त्रास होतो, याची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी युवा खेळाडू शेख समी, शेख हारुण, शेख मुज्जू, नवीद बागवान, गणेश लोणारी, अरशद मनीयार आदी खळाडूंनी केली
विद्यार्थ्यांना होतोय त्रास - मुख्याध्यापिका
४जि.प. मुख्याध्यापिका कांचन पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मैदानावर दारु पिण्याचे प्रकार व काचा फोडण्याच्या प्रकाराचा विद्यार्थी व खेळाडूंना त्रास होतो. या प्रकारासंदर्भात जि.प.च्या वरिष्ठांकडे संरक्षक भिंतीसाठी पाठपुरावा केलेला आहे. अभियंत्यांनी पाहणीही केली. पोलीस अधिकाºयांनाही या प्रकरणात लक्ष घालावे, अशी समक्ष भेटीत मागणी केलेली असल्याचे मुख्याध्यापिका कांचन पतंगे यांनी सांगितले.
जि.प. मैदानावर सराव करून वसमतच्या खेळाडूंनी राष्टÑीय स्तरावर नाव कमावलेले आहे. आजही वसमतचे प्रगल्भ युवा खेळाडू या मैदानावर सराव करत असतात. मात्र दररोज रात्री ओपन बारसारखा मैदानाचा वापर होत असल्याने खेळाडूंना त्रास होत आहे. जिल्ह्याचे वैभव असलेल्या या मैदानावरील खेळ जिवंत ठेवण्यासाठी व खेळाडूंना सुरक्षितता देण्यासाठी प्रशासनाने मैदानाला संरक्षक भिंत बांधावी, दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा फुटबॉल असोशिएशनचे सचिव अजगर पटेल यांनी केली.

Web Title:  Open Bar's rise in the open bars in Vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.