ठळक मुद्देवर्गखोल्यांचे बांधकाम अद्याप सुरूच झाले नाहीसन २०१६-१७ मध्ये १२५ कामांचा निधी मंजूर

हिंगोली : शासनाकडून शाळेच्या नवीन वर्गखोल्या, तसेच स्वच्छतागृहे व दुरूस्तीसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र बांधकामाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यातील २०१६-१७ मधील शाळांच्या विविध प्रकारच्या १२५ कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी शाळा दुरूस्तीची केवळ १५ कामे पूर्ण झाली. तर शाळा बांधकाम अजूनही सुरूच झाले नाही, हे विशेष.

शाळेत ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होणार नाही, त्यांचे अभ्यासातून मन विचलित होऊ नये, शिवाय शिकक्षकांनाही अध्यापन करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानातंर्गत अनेक शाळांतील धोकादायक वर्गखोल्या, स्वच्छतागृह तसेच नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली होती. विविध प्रकारच्या बांधकामासाठी १ कोटी ९० लाखांचा निधीस शासनाकडून मंजुरी मिळाली. यातील २५ टक्के निधी संबधित शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमाही करण्यात आला. मात्र दुरूस्तीची कामे सोडली तर नवीन बांधकामास अद्याप सुरूवातच करण्यात आली नाही. त्यामुळे बांधकामाबाबत नेमका काय गोंधळ सुरू आहे, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. 

वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे अनेकदा दोन वर्गातील विद्यार्थ्यांना कधी-कधी एकत्र किंवा शाळा परिसरातील झाडाखाली, प्रांगणातील व्हरांड्यात बसवून धडे दिले जातात. मात्र अशावेळी विद्यार्थ्यांचे लक्ष अध्ययनात मन लागत नाही. तिथे घडणाºया गोष्टी विद्यार्थ्यांच्या नजरेत पडतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलीत होते.  त्यामुळे शाळेत पुरेशा वर्गखोल्या असणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती पूर्णत: जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात तर चक्क शाळांना गळती लागते. दरवर्षी केवळ डागडुजी करून काम धकवून घेतले जाते. त्यामुळे आता सदर बांधकामाकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. तशी मागणीही स्थानिक ग्रामस्थांतून केली जात आहे.

वसमत तालुक्यातील २६ विविध कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी केवळ ५ कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे कोठारी येथील वर्गखोली बांधकामाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर रिधोरा येथील मंजूर १ वर्गखोलीचे बांधकाम अपूर्णच आहे. तसेच वसमत तालुक्यातील करंजाळा, गुंडा, धामणगाव, दारेफळ, थोराव व किन्होळा येथील शाळेतील स्वच्छतागृहांच्या बांधकामास सुरूवातच झाली नाही. औंढा येथील २१ कामांना मंजूरी मिळाली होती. केवळ दोन दुरूस्तीचे कामे सोडले तर चारही वर्गखोल्यांचे बांधकामास प्रारंभच करण्यात आला नाही.

सेंदूरसना, उखळी येथील स्वच्छतागृहाच्या बांधकामाचाही प्रश्न कायम आहे. कळमनुरी येथील २३ कामांना मंजूरी मिळाली असून केवळ दुरूस्तीचे दोन कामे झाली आहेत. यामध्ये हिवरा येथील २ वर्गखोल्यांचे कामास सुरूवात झालीच नाही. तसेच उर्ध्व पैनगंगानगर, साळवा, जवळापांचाळ (उर्दू) येथील स्वच्छतागृहाचे बांधकाम झाले नाहीत. सेनगाव येथील ३० कामांना मंजुरी मिळाली होती, त्यापैकी दुरूस्तीचे चार कामे झाली असून सापडगाव येथील वर्गखोलीचे बांधकाम व हाताळा येथील स्वच्छतागृहाचे बांधकाम झालेच नाही.

शाळा दुरूस्तीला प्राधान्य
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या १२५ कामांना मंजुरी आहे. यामध्ये ३९ नवीन वर्गखोल्या व स्वच्छतागृहांचे बांधकाम तसेच शाळा दुरूस्तीच्या १७ कामे आदींचा सामावेश करण्यात आला होता. यासाठी शासनाकडून १ कोटी ९० लाख मंजूर असून त्यापैकी नियमाप्रमाणे सर्व शिक्षा अभियानकडून २५ टक्के निधी संबधित समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यातील एकाही नवीन वर्गखोलीचे बांधकाम सुरू झाले नसून स्वच्छतागृहांचेही अनेक कामे अपूर्णच आहेत. केवळ शाळा दुरूस्तीचे कामे मात्र आवर्जून करण्यात आली आहेत.

चौकशी सुरू
हिंगोली तालुक्यातील २५ कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी दुरूस्तीची केवळ दोनच कामे पूर्ण झाली आहेत. राहुली खु. येथील वर्गखोली बांधकामाची चौकशी सुरू आहे, तर डिग्रसवाणी येथील स्वच्छतागृहाचे बांधकाम झालेच नाही.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.