Navalgawan lake question question | नवलगव्हाणचा तलाव प्रश्न मार्गी

ठळक मुद्देहिंगोली : जलसंपदा विभागाने दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण येथील दोन वर्षापासून रेंगाळत पडलेल्या जलसंपदा विभागाच्या तलावाचा प्रश्न आता मार्गी लागला असून तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशानाने मागीतलेली रक्कम देण्याची जलसंपदा विभागाने तयारी दाखविलेली आहे. त्यामुळे येत्या जून महिन्यात तलावात पाणी साचणार असल्याचे चित्र आहे.
नवलगव्हाण येथील तलावाचे काम ८५ टक्के पुर्ण झाले होते. परंतु उर्वरित काम हे रेल्वे हद्दीत येत असल्याने त्याला रेल्वेची परवानगी घेणे गरजेचे असल्याने हे काम चांगलेच लांबणीवर गेले होते. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तलावाला भेट देवून बारकाईने पाहणी केल्यामुळे तलावाचे काम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे जलसंपदा विभागाने पत्रव्यवहार सुरूच ठेवला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ४ कोटींची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. ती देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दाखविली असून पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपयांचा धनादेश रेल्वे प्रशासनाला गुरूवारी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जूनअखेरपर्यंत काम संपविण्याचेही पत्र दिले जाणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्यास हा प्रश्न येत्या जूनपर्यंत निकाली निघण्याची शक्यता आहे.
तलाव बांधकामाची रक्कम साडेपाच कोटी असली तरीही इतर खर्च मिळून २४ कोटीपर्यंत जात आहे.