ठळक मुद्देयावेळी प्रा. श्याम मानव यांनी वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया या विषयावर उपस्थितांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले.

हिंगोली : बुवा-बाबांच्या चमत्कारावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने डोळस श्रद्धा ठेवावी. शिवाय श्रद्धेची चिकित्साही करणे तितकेच महत्त्वाचे असून श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतरण होऊ देऊ नका असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी आयोजित व्याख्यानात व्यक्त केले. यावेळी सुरेश जुरमुरे, पुरूषोत्तम आवारे, मनोज आखरे, पोनि मारोती थोरात, जयाजी पाईकराव, विजय कांबळे, प्रकाश मगरे, शरद वानखेडे, महमंद मजहर, धम्मपाल कांबळे, दत्ता तपासे, मोरे यांच्यासह मान्यवर व समितीचे पदाधिकारी तसेच हिंगोली शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंगोली शाखेचे वतीने सोमवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रा. श्याम मानव यांनी ' वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया ' या विषयावर उपस्थितांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले. प्रा. मानव म्हणाले आचार्य अत्रे यांच्या शिर्षकाखाली म्हणजेच वृक्ष तेथे छाया व बुवा तेथे बाया हे वाक्य आजच्या काळात शंभर टक्के लागू होत आहे. अंधश्रद्धेतून सर्वसामान्यांची लुबाडणूक होत आहे. श्रद्धेच्या नावाखाली आंधळे भक्त बुवाबाबांच्या नादी लागत आहेत. त्यामुळे अनेक नव-नवीन बाबांचा अवतार निर्माण होताना दिसत आहे. गुलाबबाबा, शुकदास महाराज, सत्यसाईबाबा यासह अनेक महाराज व बाबांची खरी माहिती उघड करून ते कशाप्रकारे चमत्कार करत असत हे त्यांनी प्रात्येक्षिकासह करून दाखविले. त्यामुळे श्रोतेही आवाक् झाले होते. हवेत हात फिरवून चमत्कार करून सोन्याच्या वस्तू आकाशातून आणणा-या ढोंगी बाबांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान जातात ही मोठी शोकांतिका असल्याचे मानव म्हणाले. 

चमत्कार करा, २५ लाखांचे बक्षीस मिळवा 
देवा-धर्माच्या नावावर महिलांचे शोषण केले जाते. त्यांचा उपभोग बाबा व महाराज घेत असून याला आळा बसावा व फसवेगिरी करणा-यांविरूद्ध अंनिस भारतभर जादुटोणाविरोधी कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवित आहे. समितीसमोर कोणीही चमत्कार करून दाखवावा व २५ लाखांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान  दिले होते. परंतु कुणीही आमच्यासमोर आला नाही, चमत्कार करण्याचे धाडस केले नाही. कारण तोच फसवेगिरी करून समाजाला लुबाडणारा होता. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता श्रद्धेची चिकित्सा करण्याचे आवाहन यावेळी मानव यांनी केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.