Kautha school to cook Rice after a month | कौठ्याच्या शाळेत पुन्हा शिजणार खिचडी; महिन्याभरानंतर मिळाला तांदूळ

हिंगोली : वसमत तालुक्यातील कौठा परिसरातील शाळेला तांदूळ पुरवठा बंद असल्यामुळे येथील शाळेत मागील एक महिन्यापासून शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ शिजणे बंद होती. यासंदर्भात १ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये ‘तांदळाअभावी पोषण आहार बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जागे झालेल्या संबंधित यंत्रणेने सदर शाळांना २ जानेवारी पासून शालेय पोषण आहाराचा तांदूळ पुरवठा केला आहे.

मागील एक महिन्यापासून कौठासह परिसरात शाळेतील खिचडी तांदळाअभावी बंद होती. शाळांना पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळ पुरवठा करण्याचे काम हे कंत्राटदारामार्फत करण्यात येते. परंतु, मागील काही दिवसांत सदर कंत्राटदारांकडून शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. दरम्यान, तांदूळ पुरवठा करणा-या कंत्रादाराचे कंत्राट बदलण्यात आल्याने हा पुरवठा वेळेवर होत नसल्याची चर्चा होती. 

तांदूळ नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान, यासंदर्भात १ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. सदर वृत्ताची दखल घेत जागे झालेल्या संबंधित विभागाने कंत्राटदारांना सदर शाळांना तात्काळ तांदूळ पुरवठा करण्याबाबत कडक सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर २ जानेवारी रोजी कौठा येथील जि.प. शाळा व माणकेश्वर विद्यालयात तांदूळ पोहोचला असून सदर शाळांमध्ये ३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.