Hingoli tehsildar Gajanan Shinde suspended in delay of farmer suicide case | हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे निलंबित; शेतकरी आत्महत्या  प्रकरणात दप्तरदिरंगाईचा ठपका

ठळक मुद्देहिंगोली तालुक्यातील आंबाळा तांडा येथे शेतकरी वामन घासीराम जाधव यांनी २०१५ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होतीवडील गेल्यानंतर मुलगा संजय जाधव यांच्यावर घरची जबाबदारी पडली. मात्र त्यांच्या आजी व अपंग आईची प्रकृती खालावल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते.तहसीलदारांकडे ठेव म्हणून असलेल्या निधीची मागणी केली. मात्र तहसीलदारांनी जिल्हा शल्यचिकित्सकाचे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले होते. 

हिंगोली : आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबास दिलेली व मुदत ठेवीच्या रुपात असलेली रक्कम आईच्या आजारपणासाठी तहसील प्रशासन देत नसल्याने या शेतक-याच्या मुलानेही आत्महत्या केल्याची घटना १0 नोव्हेंबर रोजी घडली होती. यात दप्तरदिरंगाई केल्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हिंगोली तालुक्यातील आंबाळा तांडा येथे शेतकरी वामन घासीराम जाधव यांनी २०१५ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांच्या अनुदानाची रक्कम १ लाख रुपये त्यांच्या  कुटूंबियाना मंजूर झाली. त्यापैकी ३१ हजार रुपये आत्महत्याग्रस्त कुटूंबियास रोखीने दिले. तर उर्वरित ६९ हजार रुपये मुदत ठेव म्हणून ठेवले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या पश्चात अपंग पत्नी, आई, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. वडील गेल्यानंतर मुलगा संजय जाधव यांच्यावर घरची जबाबदारी पडली. मात्र त्यांच्या आजी व अपंग आईची प्रकृती खालावल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे ठेव म्हणून असलेल्या निधीची मागणी केली. मात्र तहसीलदारांनी जिल्हा शल्यचिकित्सकाचे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले होते. 

एकीकडे रुग्णांना बघायचे अन् दुसरीकडे कागदपत्रे जुळवायची अशा दुहेरी कचाट्यात ते सापडले. तरीही त्यांनी अनेकदा तहसीलकडे मागणी केली शेवटी संजय जाधव यांनीही कंटाळून १0 नोव्हेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली. आता हे कुटूंंब पूर्णत: उघड्यावर आले आहे. याबाबत तहसील प्रशासनाने जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यानेच सदर शेतक-याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करून तक्रारी देण्यात आल्या होत्या. या कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेवून तहसीलदार शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.