Hingoli district consumer forum orders insurance company for compensation against mobile lost case | हिंगोली जिल्हा ग्राहक मंचचा विमा कंपनीस भरपाई देण्याचे आदेश; मोबाईल चोरी प्रकरणात झटकले होते हात

हिंगोली : विमा उतरविलेला मोबाईल चोरीस गेल्यानंतर ग्राहकाचा दावा फेटाळणा-या विमा कंपनीस जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला. मोबाईल अथवा त्याची किंमत या दोन्हीपैकी एक अदा करण्यास आदेशित केले. या प्रकरणात ग्राहक मंचने संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करून तक्रारदारास सदरील मोबाईलची किंमत ५६ हजार रुपये अथवा त्या कंपनीचा तोच मोबाईल देण्याचा आदेश दिला. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी १ हजार व तक्रार खर्चापोटी ५०० रुपये अशी एकूण ५७ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई ग्राहकास अदा करावी, असा आदेश दिला.

तक्रारदार दीपक अमोल शेळके रा. अष्टविनायक नगर यांनी यांनी शहरातून नामांकित कंपनीचा ५६००० किंमतीच्या मोबाईल विकत घेतला. मोबाईलवर सिस्का गॅजेट सेक्युअर या विमा कंपनीचा विमाही उतरविला होता. 

सदर विमा उतरवितेवेळेस नुकसान, चोरी किंवा हरविल्यास संपूर्ण रक्कम विमा कंपनी देईल, असा विमा काढला होता. तक्रारदारांचा २८  सप्टेंबर २०१६ रोजी मोबाईल चोरीस गेला.  तक्रारदाराने याबाबत विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता. परंतु सदर कंपनीने तो फेटाळला. त्यामुळे तक्रारदाराने अ‍ॅड. अमोल जाधव यांच्यामार्फत विमा कंपनी व मोबाईल दुकानदाराविरूद्ध नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यावरून  मंचच्या अध्यक्षा ए.जी. सातपुते व सदस्य गे.ह. राठोड यांच्यासमक्ष प्रकरण चालले. 

ग्राहक मंचने संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करून तक्रारदारास सदरील मोबाईलची किंमत ५६ हजार रुपये अथवा त्या कंपनीचा तोच मोबाईल देण्याचा आदेश दिला. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी १ हजार व तक्रार खर्चापोटी ५०० रुपये अशी एकूण ५७ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई ग्राहकास अदा करावी, असा आदेश दिला. तीस दिवसांत रक्कम किंवा मोबाईल न दिल्यास सहा टक्के व्याजदर लावण्याचे आदेशित केले.प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार मार्फत अ‍ॅड. अमोल एम. जाधव यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. एम.एन. कदम व अ‍ॅड. उमेश पाटील व अ‍ॅड. सतीश पठाडे यांनी सहकार्य केले.