आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:31 PM2018-06-19T18:31:09+5:302018-06-19T18:31:09+5:30

गेल्या चार वर्षांपासून प्रशासकाकडून कारभार सुरू असलेल्या आखाडा बाळापूरच्या बाजार समितीवर लवकरच लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे.

In the final phase preparations for the elections of Akhada Balapur Agricultural Produce Market Committee | आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

Next

आखाडा बाळापूर (हिंगोली ) : गेल्या चार वर्षांपासून प्रशासकाकडून कारभार सुरू असलेल्या आखाडा बाळापूरच्या बाजार समितीवर लवकरच लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. बाजार समितीच्या मतदार यादीवर अंतिम हात फिरवण्यात आला असून याद्यांना मान्यता मिळताच निवडणूक कार्यक्रम घोषित होवू शकतो. १५ गणांमधील १२० गावांतील तब्बल १५ हजार ३८४ मतदारसंख्या असलेल्या या बाजार समिती निवडणुकीकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. 

आखाडा बाळापूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यापूर्वी ७ मार्च २०१० रोजी झाली. ८ मार्च २०१५ रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर ३१ मार्च २०१५ पासून या बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. तेव्हापासून येथे निवडणुकांचा कार्यक्रम न घेता प्रशासकाचा कारभार सुरू होता. राजकीय शह- काटशह देत येथे निवडणुका टाळल्या गेल्या. युती सरकारकडून मध्यंतरी अशासकीय मंडळ नियुक्तीचे सोपस्कर जवळपास पूर्ण झाले होते. मंडळावर वर्णी लागणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीत ये- जा सुरू करून कर्मचाऱ्यांवर फर्मान सोडणेही सुरू केले होते. पण हिंगोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय बोंढारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अशासकीय मंडळ न नियुक्त करता निवडणुका घेण्याची मागणी केली.

त्यानुसार तीन महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पण मध्येच मतदार यादीत शेतकऱ्यांच्या नावांचा सहभाग करण्याचा नियम आला. त्याआधारे निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने न्यायालयाकडून मुदतवाढ मिळवली. आता नवीन नियमाप्रमाणे मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर अंतिम हात फिरवण्यात आला आहे. त्यानुसार बाजार समिती कार्यक्षेत्रातील १२० गावांचा सहभाग आहे. त्याच १५ गण तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये आखाडा बाळापूर गण (१५ गावे ३३७९ मतदार), शेवाळा गण (८ गावे ३५९५ मतदार), घोडा गण (६ गावे ३२३२ मतदार), कांडली गण (९ गावे ३४४० मतदार), वारंगा गण (७ गावे ३५७९ मतदार), डोंगरकडा गण (६ गावे ३७३९ मतदार), जवळा पांचाळ गण (७ गावे ३५९८ मतदार), दांडेगाव गण (७ गावे ३२५१ मतदार), पेठवडगाव गण (९० गावे ३२०० मतदार), सिंदगी गण ( ६ गावे ३५७० मतदार), नांदापूर गण (९ गावे ३५५७ मतदार), पिंपळदरी गण (८ गावे ३१८२ मतदार), जलालदाभा गण (८ गावे ३१८५ मतदार), लाख गण (९ गावे ३२९० मतदार), कोथळज गण ( ९ गावे ३६१० मतदार) अशा तीन तालुक्यातील १५ गणांमध्ये १२० गावांचा सहभाग असून, ५१, ३८४ एवढ्या शेतकरी मतदारांचा सहभाग आहे. या मतदार याद्यांना मंजुरी मिळताच कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा होऊ शकते.

पाच प्रशासकांनी पाहिला कारभार
बाजार समितीने ३१ मार्च २०१५ पासून पाच प्रशासक पाहिले. प्रथम माहोरे, बोलके, चौधरी, फिसके आणि सध्या मैत्रेवार यांचा कार्यभार सुरू आहे. चार वर्षांत पाच प्रशासकांचा कारभार पाहिल्यानंतर आता निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. 

चार बूथवरून थेट १२५ बूथची भरारी
आखाडा बाळापूर बाजार समिती निवडणुकांसाठी यापूर्वी केवळ चार बुथवर मतदार प्रक्रिया पार पडायची. पणआता १२० गावात किमान १२५ बुथवर मतदान होणार आहे. चार बुथ ते १२५ बुथही वाढ असून चार ते पाच लाखांचा निवडणूक खर्च आता २५ ते ३० लाखांत जाण्याची शक्यता आहे. 

मिनी विधानसभेचे रूप
बाळापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र कळमनुरी, औंढा आणि हिंगोली अशा तीन तालुक्यात विस्तारलेले आहे. प्रत्येक गावातील शेतकरी आता मतदार बनल्यामुळे बाजार समितीला मिनी विधानसभेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. १२० गावातील ५१, ३८४ मतदारांपर्यंत पोहीचण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे. या निमी विधानसभेकडे राजकीय पक्षांनीही गांभिर्याने पाहणे सुरू केले आहे. 

Web Title: In the final phase preparations for the elections of Akhada Balapur Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.