Evergreen Environment; Good opportunity for the campaigners | पुन्हा बिघडले वातावरण; प्रचारकांना चांगली संधी
पुन्हा बिघडले वातावरण; प्रचारकांना चांगली संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी जेरीस आला असून आंबा पाडाला येण्यापूर्वीच गळ लागल्याने कैऱ्यांचीच विक्री करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिरवाळी वातावरणाचा लाभ उठवत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र दिवसभर जोमाने प्रचार करू शकत आहेत.
दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४२ अंशांच्याही पुढे जात आहे. त्याचा परिणाम म्हणून हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारात रंगत भरत नसल्याचे दिसत आहे. गावोगाव, घरोघर भटकंती करण्यापेक्षा सर्कलच्या ठिकाणी अथवा मोठ्या गावांत सभा घेण्याचा सपाटा सुरू असल्याचे दिसते. त्याचबरोबर काही ठिकाणी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवरच प्रचाराचा भार टाकून त्यांना वाहनांद्वारे परिसरातील गावांत पक्षाचा प्रचार करण्यास सांगितले जात आहे. मात्र दुपारच्या वेळी ही मंडळी उन्हाच्या कडाक्यात घराबाहेर पडत नव्हती. आज मात्र ढग दाटल्याने शिरवाळी वातावरणाचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी दुपारीही प्रचार सुरू ठेवल्याचे पहायला मिळाले.
जिल्ह्यातील काही भागात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. तर हिंगोलीसह परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरीही कोसळल्या. त्याचा कोणताच फायदा होणार नसला तरीही ढगाळी वातावरणाने तापमान खाली उतरल्याचे दिसून येत होते.


Web Title:  Evergreen Environment; Good opportunity for the campaigners
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.