District Hospital | जिल्हा रूग्णालयात पाण्याविना रूग्णांचे हाल
जिल्हा रूग्णालयात पाण्याविना रूग्णांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा रूग्णालयातील रूग्ण व नातेवाईकांचे पिण्याच्या पाण्याविना हाल होत आहेत. रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून आहे. रूग्णालय परिसरातील पाणपोईवर रूग्ण व नातेवाईकांची गर्दी होत आहे.
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची नेहमी गर्दी असते. परंतु या ठिकाणी रूग्णांना हवी तशी सेवा मिळत नाही. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून नियोजन केले जात असले तरी, प्रत्यक्षात मात्र नियोजन कागदावरच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना पाणी पिण्यासाठी दोन ठिकाणी पाणी फिल्टर बसविलेले आहेत. परंतु या फिल्टची तुटफुट झाल्याने आता त्यात पाणी भरले जात नाही. त्यामुळे पाण्याविना हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयाला पालिकेच्या टाकीतून पाणीपुरवठा होतो. परंतु अधून-मधून हा पाणीपुरवठा बंद होतो. कधी पाईपलाईन फुटते, तर कधी तांत्रिक अडचणी येतात. सध्या पालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत सुरू असला तरी, प्रत्यक्षात मात्र रूग्णालयात पाणीच उपलब्ध नसल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे रात्री-अपरात्री रूग्ण व नातेवाईकांची पाण्याविना गैरसोय होत आहे. ऐन उन्हाळ्यात तरी रूग्णालय प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. परंतु रूग्णालय परिसरातील साई माऊली पाणपोईची सुविधा असल्याने रूग्णालयातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जात नसल्याचे दरवर्षीच दिसून येते. यंदाही गतवर्षीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. नवीन इमारतीत स्थलांतरीत झालेल्या वार्डामध्ये तर पाण्याची कुठलीच सुविधा नाही. रूग्ण व त्यांचे नातेवाईक परिसरात पाण्यासाठी फिरत आहेत.
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाºया रूग्णांची पाण्यावाचून गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात असून तसे नियोजनही करण्यात आले आहे. परंतु रूग्णालयातील फिल्टरची तोडफोड कोणी तरी केली आहे. त्यामुळे त्यात सध्या पाणी भरले जात नाही. रूग्णालयातील पाण्याच्या सेवेसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही असे जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.


Web Title:  District Hospital
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.