दोन्ही अपहृत बालके सापडली पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:58 PM2018-12-25T23:58:23+5:302018-12-25T23:58:39+5:30

शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कमलानगर येथील बालगृहातून दोन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात २२ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 Both kidnapped children were found in Pune | दोन्ही अपहृत बालके सापडली पुण्यात

दोन्ही अपहृत बालके सापडली पुण्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कमलानगर येथील बालगृहातून दोन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात २२ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील भानुदास सोनाजी बुक्कन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की हिंगोली शहरातील कमलानगर येथील अनाथ मुलांच्या बालगृहातून त्यांचा मुलगा व त्याच्या मित्राचे कोणीतरी अपहरण केले. मुले अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी जवळपास शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यामुळे अखेर ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तसेच विविध पोलीस ठाण्यात हिंगोली येथून दोन मुले मिसिंग असल्याची माहिती व त्यांचे फोटोही संबधित पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले होते. २५ डिसेंबर रोजी ही दोन्ही मुले पुणे येथील रेल्वेस्थानक परिसरात फिरत असताना तेथील पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी हिंगोली येथील पोलिसांना मुले सापडल्याची माहिती दिली. हिंगोली येथीलच मुले आहेत, या खात्रीसाठी मोबाईलवर फोटोही पाठविले. त्यानंतर हिंगोली येथीलच मुले असल्याचे स्पष्ट झाले.
दोन्ही मुलांना पुणे येथील बालगृहात ठेवले आहे. संबंधित बालगृहाच्या अधीक्षकांशीही हिंगोली पोलिसांनी दूरध्वनीवरून संपर्क करून मुलांविषयी खात्री करून घेतली. लवकर दोन्ही मुले पालकांच्या स्वाधीन केले जातील, असे पोउपनि गोहाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. हिंगोली येथून पोलिसांचे पथक दोन्ही मुलांच्या नातेवाईकांना घेऊन पुण्याला जाणार आहेत.
पोलिसांचे पथक पुण्याला...
हिंगोली येथील बेपत्ता मुले पुण्यात सापडली आहेत. त्यामुळे हे दोन्ही मुले पुण्यापर्यंत कसे काय पोहोचली. ती स्वत:हून गेलीत का? त्यांचे कोणी अपहरण केले. याची माहिती घेतली जाणार आहे. हिंगोली येथून पोलीस पथक पुण्याला जाऊन या दोन्ही बालकांना ताब्यात घेणार आहे. अचानक मुले बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. परंतु आता मुलांचा शोध लागल्याने नातेवाईकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. लवकरच मुलांना त्यांच्या स्वाधीन केले जाईल. मुलांचे अपहरण करण्यात आल्याचे समजताच महिला व बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत संबधित शाळेची भेट घेऊन चौकशी केली होती.

Web Title:  Both kidnapped children were found in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.