Want to lose the stress, then go for swimming! | स्ट्रेस घालवायचाय, मग स्विमिंगला जा!..

ठळक मुद्देताण घालवायचा असेल आणि एकदम फ्रेश व्हायचं असेल तर एक उत्तम उपाय म्हणजे स्विमिंग. पोहायला जाणं.रोज थोडा वेळ जरी तुम्ही स्विमिंग केलं तरीही तुमच्या सर्वांगाला व्यायाम मिळेल आणि तुमची दुखणीही पळायला मदत होईल.विशेषत: ज्यांना नैराश्यानं घेरलेलं आहे किंवा बैठ्या कामामुळे अनेक प्रकारची दुखणी ज्यांना लागलेली आहेत, त्यांच्यासाठी स्विमिंग रामबाण उपाय आहे.

- मयूर पठाडे

सारखं एकच एक काम केल्यामुळे, एकाच जागी बसून आपलं अंग आंबतं. कंटाळा येतो. स्थूलपणा येतो. काम करायला उत्साह राहत नाही. अशा अनेक गोष्टी.. पण इतकंच नाही, आपलं काम जर बैठं असेल, तर त्यामुळे तुमच्या मनावरचा ताण वाढतो, त्याचा लवकर निचरा होत नाही असंही सिद्ध झालंय. शिवाय एकाच जागी बसल्यामुळे, विशेषत: आॅफिसमध्ये तासन्तास खुर्चीत बसल्यामुळे आपल्या शरीरातील सारं द्रव आणि रक्त पायाकडे साकळतं. त्यामुळे पायही दुखायला लागतात. जड होतात. त्यामुळे तुम्ही इरिटेट होता. मनावरचा ताणही आपसूक वाढत जातो..
पण हा ताण घालवायचा असेल आणि एकदम फ्रेश व्हायचं असेल तर एक उत्तम उपाय म्हणजे स्वीमिंग. पोहायला जाणं. रोज थोडा वेळ जरी तुम्ही स्विमिंग केलं तरीही तुमच्या सर्वांगाला व्यायाम मिळेल आणि तुमची दुखणीही पळायला मदत होईल. विशेषत: ज्यांना नैराश्यानं घेरलेलं असतं किंवा बैठ्या कामामुळे अनेक प्रकारचे विघातक बदल शरीरात कळत, नकळत होत असतात, त्यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी पोहणं हा एक उत्तम उपाय आहे.
यामुळे तुम्ही केवळ फिटच राहात नाही, तर शरीर आणि मनानंही तुम्ही रिलॅक्स होता. एक नवी ऊर्जा आणि चैतन्य तुम्हाला मिळतं. आपल्या ताणाचा निचरा करायचा तर तो अतिशय उत्तम उपाय आहे.
अर्थात यावर कोणी म्हणेल, आम्हाला तर स्विमिंग येतच नाही, मग काय करायचं? शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, पोहायला येत नसलं तरी चालेल, पण पाण्याचा तुमच्या शरीरावर सकारात्मक उपयोग होतो. त्यामुळे तरणतलावावर जाऊन शॅलो पाण्यात डुबक्या मारल्या तरी तुम्हाला तोच इफेक्ट मिळू शकतो.