विचारांमधील गुंतागुंत टाळली तर कामाच्या ठिकाणी तणाव टाळता येईल- डॉ. राजेंद्र बर्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 12:35 PM2017-10-10T12:35:59+5:302017-10-10T12:48:49+5:30

कामाचे ठिकाण याचा अर्थ केवळ कार्यालय असा होत नाही तर ते कोणतेही ठिकाण असू शकते. एखादी गृहिणी घरात काम करत असेल तर ते तिचे कामाचे ठिकाण होय. आजकाल आपल्याकडे कामाचे स्वरुप, त्याचा ताण बदलत आहे.

Tension can be avoided at work if you avoid complications in thinking - Dr. Rajendra Barve | विचारांमधील गुंतागुंत टाळली तर कामाच्या ठिकाणी तणाव टाळता येईल- डॉ. राजेंद्र बर्वे

विचारांमधील गुंतागुंत टाळली तर कामाच्या ठिकाणी तणाव टाळता येईल- डॉ. राजेंद्र बर्वे

googlenewsNext

मुंबई - कामाचे ठिकाण याचा अर्थ केवळ कार्यालय असा होत नाही तर ते कोणतेही ठिकाण असू शकते. एखादी गृहिणी घरात काम करत असेल तर ते तिचे कामाचे ठिकाण होय. आजकाल आपल्याकडे कामाचे स्वरुप, त्याचा ताण बदलत आहे. प्रत्येक कार्यालयात कामाचे टारगेट, डेडलाईन, वरिष्ठांचा दबाव तसेच इतर अनेक घटकांमुळे ताण निर्माण होत असतो.

आपल्याकडे साधारणतः आठ ते नऊ तासांची शिफ्ट व येण्याजाण्यासाठी लागणारा सरासरी तीन तासांचा काळ मोजला तर ११ ते १२ तास कामासाठी जातात. म्हणजेच जागेपणाचा फार मोठा वेळ कामासाठी जातो. त्यामुळे सर्वाधिक काळ लोकांच्या डोक्यात, मनात कामाचेच विचार राहतात. कार्यालयात प्रत्येकाला एक भूमिका घेऊन काम करावं लागतं. जेव्हा तुम्ही इतका वेळ कार्यालयात घालवता तेव्हा ती भूमिका तुम्हाला चिकटून तुमच्याबरोबर येते. ती तुमच्याबरोबर घरातही प्रवेश करते. इथेच ताण वाढीस लागतो. 

अफगाणिस्तान आणि इराकच्या मोहिमेवर असणा-या अमेरिकन सैन्याच्या अनुभवांवरुन " व्हुकावर्ल्ड" (VUCAWORLD) ही संज्ञा हॉर्वर्ड विद्यापीठाने तयार केली आहे. यातील व्ही म्हणजे व्होलाटिलिटी, म्हणजे सतत बदलणारी स्थिती, यू म्हणजे अनसर्टनिटी, म्हणजे कधीही काहीही होऊ शकतं अशी स्थिती, सी म्हणजे कॉम्प्लेक्स, म्हणजे गुंतागुंतीची स्थिती, ए म्हणजे अॅम्बिग्विटी म्हणजे सर्वच बाजू बरोबर किंवा चूक वाटायला लागतात आणि निर्णय घेणे अवघड जाते. ही स्थिती सर्व कार्यालयांमध्ये तयार झालेली आहे.


पूर्वीच्या काळात मोजकेच जवळचे मित्र होते पण आता सोशल मीडियामुळे हजारो लोक आपल्या फोननध्ये सतत उपलब्ध असतात. कोण काय करतंय, कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हो सतत आपण फोन उघडून पाहात असतो. साधा सिनेमा पाहायचा तर, "अरे हो तो सिनेमा मला पाहायचाय रे, कसाय तो ?" असं विचारून विनाकारण स्वतःच्या निर्णयांवर दुस-यांचा प्रभाव ओढवून घेतो. यामुळे अनेक विचार, अनेकांचे प्रभाव डोक्यात येतात आणि गुंता तयार होतो, त्याचा परिणाम साधेसाधे निर्णय घेण्यावरही दिसून येतो. या गुंत्यामुळे मन स्थिर राहात नाही, तो विस्कळीत राहतं. मनाला शांतता नाही म्हणून मनस्वास्थ्य नाही असं ते दुष्टचक्र तयार होतं. मनस्वास्थ्य म्हणजे " 'स्व'मध्ये स्थिर झालेलं मन". ते तसं स्थीर नसेल तर ताण येतात. कामातून येणा-या अतिरेकी ताणामुळे 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ला सामोरे जावे लागते, त्याचे परिणाम अधिकाधिक त्रासदायक होत जातात. नुकतेच जपानमध्ये एका महिलेने सुटी न घेता सलग अती काम केल्यामुळे तिचा मृत्यू ओढावल्याची बातमी आपण वाचली असेल.

अतिताणयुक्त कामाचे उदाहरण द्यायचे झाले तर जे पोलीस अनेक तास ड्युटी करतात त्याचप्रमाणे उभे राहून, वाहतुकीचे नियोजन, गर्दी, मोर्चांना, निदर्शने, दगडफेक यांना तोंड देतात त्यांना अनेक ताणांना सामोरे जावे लागते. तसेच अपुरी झोप, अपुरी विश्रांती यामुळे चिडचिडेपणा वाढतो. आजकाल यामुळे सर्वांची मनं कधीही उद्रेक होण्याच्या स्थितीत जाऊन पोहोचली आहेत. आता यातून बाहेर कसं बरं पडायचं ? तर त्यावर 'माइंडफुलनेस' टिकवणं हे उत्तर म्हणता येईल. मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणेत मिळणारी जी शांतता किंवा जे जागं मन असतं ते कायम टिकवणं म्हणजे माइंडफुलनेस. त्यामुळे 'हा' विचार का मनात आला, 'हा ताण' का येतोय मनात? हे लगेच समजत राहतं.

गुगल, अॅमेझॉन, जीई किंवा अनेक भारतीय कंपन्यांनी आता यावर काही उपाय शोधून काढले आहेत.कर्मचार्यांना विश्रांतीसाठी हक्काची सुटी घ्यायला लावणं, अमूक वेळेनंतर काम बंद करणे असे नियमच या कंपन्या करत आहेत. तसेच कार्यालयात व्यायामशाळा, ध्यानधारणा यासाठी वेळ आणि जागा देणं असेही उपाय या कंपन्या करतात. असे अभिनव उपाय या कंपन्या शोधत आहेत त्याचा त्यांनाही उपयोग होतो. लक्षात ठेवा, आनंदी राहणं हा आपल्या सगळ्यांचा हक्कच आहे, चला ! आनंदी राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया !

(लेखक मुंबईस्थित ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ असून त्यांनी मानसशास्त्र विषयक अनेक घटकांवर विपुल लेखन केले आहे.)

Web Title: Tension can be avoided at work if you avoid complications in thinking - Dr. Rajendra Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य