Television in bedroom hampering children growth | पर्सनल टिव्हीमुळे मुलांच्या आरोग्यावर होतात वाईट परिणाम - रिसर्च
पर्सनल टिव्हीमुळे मुलांच्या आरोग्यावर होतात वाईट परिणाम - रिसर्च

(Image Credit : FirstCry Parenting)

आपण अनेकदा घरातील थोरा मोठ्यांकडून ऐकतो की, मुलांवर लहानपणी जे संस्कार होतात त्यांचंच अनुकरण ते आयुष्यभर करत असतात. सध्या मुलं बाहेर मोकळ्या मैदानांमध्ये खेळण्यासाठी जाण्याऐवजी तासन्तास एकाच जागी बसून टिव्ही पाहत असतात. नाहीतर व्हिडीओ गेम्स खेळत असतात. तसं पाहायला गेलं तर टिव्ही पाहणं वाईट नाही पण एखादी गोष्ट सतत करणं वाईट असतं. ज्यामुळे भविष्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून सांगितल्याप्रमाणे, वयाने लहान असणाऱ्या मुलांनी जास्त टिव्ही पाहिल्याने त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम होतो. 

पेडियाट्रिक रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, लहानपणी जास्त टिव्ही पाहिल्याने मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक विकासावर परिणाम होतो. याव्यतिरिक्त संशोधनातून या गोष्टीवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं की, टिव्ही पाहण्याच्या सवयीमुळे मुलं जंक फूडकडे आकर्षक होतात. 

संशोधनातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, जर मुलांना लहान वयातच त्यांचा स्वतःचा पर्सनल टिव्ही देण्यात आला तर यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर काय परिणाम होतात? या संशोधनातून संशोधकांनी जवळपास 1997 ते 1998 मध्ये जन्मलेल्या 1859 मुलांची माहिती गोळा केली. याव्यतिरिक्त त्यांनी 13 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्याचा अभ्यास केला. या मुलांच्या अभ्यास करतानाची काही निरिक्षणं नोंदवली. उदाहरण म्हणून मुलांचं बॉडी मास चेक करण्यात आलं. तसेच त्यांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष देण्यात आलं असून शिक्षकांकडून त्यांच्या व्यवहाराबाबत जाणूनही घेण्यात आलं. याव्यतिरिक्त मुलांच्या मित्र-मैत्रिणींबाबतही जाणून घेण्यात आलं, कारण त्यांच्या सोबतीचाही त्यांच्यावर परिणाम होत असतो. 

या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष चांगले नव्हते. संशोधनानुसार ज्या घरांमध्ये लोकांनी आपल्या छोट्या मुलांच्या बेडरूममध्ये त्यांच्यासाठी एक पर्सनल टिव्ही लावला होता. त्या मुलांच्या विकासावर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आलं. त्या मुलांमध्ये भविष्यामध्ये बीएमआय, जंक फूडबाबत आकर्षण, डिप्रेशन इत्यादी समस्या होतात. 

संशोधनाचे मुख्य संशोधक लिंडा पगानि यांच्यानुसार, तुम्ही तुमच्या घरी टिव्ही कुठे ठेवता, याचाही तुमच्या मुलांच्या जीवनावर परिणाम घडून येतो. त्यांनी या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं की, टिव्ही कधीही पर्सनल बेडरूममध्ये ठेवू नये. तसेच एका ठराविक वेळेतच मुलांना पाहण्यासाठी परवानगी द्यावी. 


Web Title: Television in bedroom hampering children growth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.