ब्रेन स्ट्रोकच्या धोक्याबाबत सेन्सर करणार अलर्ट, रक्ताच्या दोन थेंबामधून कळणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 01:51 PM2019-01-06T13:51:45+5:302019-01-06T20:05:32+5:30

डोक्यावर कोणीतरी हातोडीनं प्रहार करतंय, अनेकदा एवढं वाईटरित्या डोकं दुखत असतं. तरीही बरेचजण या त्रासाला किरकोळ दुखणं ठरवून त्याकडे कानाडोळा करतात. पण याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध होणे, तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल. कारण हा त्रास कदाचित ब्रेन स्ट्रोकमुळेदेखील होऊ शकतो

new sensor based blood test to prevent people having brain stroke | ब्रेन स्ट्रोकच्या धोक्याबाबत सेन्सर करणार अलर्ट, रक्ताच्या दोन थेंबामधून कळणार माहिती

ब्रेन स्ट्रोकच्या धोक्याबाबत सेन्सर करणार अलर्ट, रक्ताच्या दोन थेंबामधून कळणार माहिती

Next
ठळक मुद्देब्रिटनमधील वारविक युनिर्व्हसिटीतील संशोधकांनी बनवलं सेन्सर मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी होण्यापासून ते ब्रेन स्ट्रोकच्या धोक्यापर्यंत सर्व माहिती देणार सेन्सर सेन्सरमध्ये बसवण्यात आलेल्या पिनच्या मदतीनं रक्त तपासणी

डोक्यावर कोणीतरी हातोड्यानं प्रहार करतंय, अनेकदा एवढं वाईटरित्या डोकं दुखत असतं. तरीही बरेचजण या त्रासाला किरकोळ दुखणं ठरवून त्याकडे कानाडोळा करतात. पण याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध होणे, तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल. कारण हा त्रास कदाचित ब्रेन स्ट्रोकमुळेदेखील होऊ शकतो. कित्येकांच्या मनात तशी शंकादेखील येते. पण डॉक्टरांकडे जाऊन या शंकेचं निरसन करण्यासाठी अनेकदा कंटाळा केला जातो. याच आळसावर ब्रिटनमधील संशोधकांनी उपाय आणला आहे. हा उपाय म्हणजे त्यांनी तयार केलेल्या सेन्सरद्वारे आता केवळ रक्ताच्या दोन थेंबांमुळे ब्रेन स्ट्रोकचा त्रास ओळखणं सहज शक्य होणार आहे. 

ब्रेन स्ट्रोकचा धोका ओळखण्यासाठी ब्रिटनमधील वारविक युनिर्व्हसिटीतील संशोधकांनी एक सेन्सर बनवलं आहे. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी होण्यापासून ते ब्रेन स्ट्रोकच्या धोक्यापर्यंत सर्व माहिती सेन्सरद्वारे मिळणं शक्य होणार असल्याचा दावा या संशोधनकर्त्यांनी केला आहे.    
सेन्सरमध्ये बसवण्यात आलेल्या पिनच्या मदतीनं रक्त तपासणी केली जाते. रक्त तपासणीमध्ये शरीरातील प्युरिनच्या पातळीचे परीक्षण केले जाते. याद्वारे रूग्णाला ब्रेन स्ट्रोकच्या त्रासाबाबत माहिती देऊन सतर्क करण्यात येते. शरीरामध्ये प्युरिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षाही अधिक वाढणं म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.

जाणून घेऊया याबाबतची अधिक माहिती... 

1. स्ट्रोक केव्हा येतात?
मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा अडथळा येणे तसंच मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा आला की मेंदूच्या पेशी निकामी होणे, अशा परिस्थितीत ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका अधिक असतो.

2 .प्युरिन म्हणजे काय?
प्युरिन हा एक असा घटक आहे, जो अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात जातो. हा पदार्थ रक्तात मिसळल्यानंतर तो किडनींपर्यंत पोहोचतो. यानंतर, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकल्या जाणाऱ्या प्रक्रियेमध्ये हा पदार्थ युरिक अॅसिडमध्ये ढकलला जाऊन, शरीराबाहेर फेकला जातो. पण बऱ्याचदा विषारी घटक शरीरातून बाहेर फेकले जात नाही. परिणामी, शरीरातील प्युरिन घटकची पातळी वाढू लागते. यामुळे पाय आणि सांधे दुखी, सूज येणे आणि रक्त प्रवाह होण्यास धमण्यांमध्ये अडथळा निर्माण होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. 

3. पहिल्याच रक्त तपासणीत मिळणार स्ट्रोकची माहिती  
संशोधनात यश मिळाल्यानंतर संशोधनकर्त्यांकडून 400 रुग्णांच्या रक्त नमुन्यांची चाचणी केली जात आहे. शिवाय, स्ट्रोकनंतर शरीराला किती प्रमाणात नुकसान सहन करावे लागते, यावरही सध्या संशोधन सुरू आहे. याबाबत माहिती देताना डॉ. याकूब बट्ट यांनी सांगितले की, केवळ रक्त तपासणीच्या मदतीनं स्ट्रोकची सर्व  माहिती सहज मिळू शकेल, अशी कोणतीही तपासणी सध्याच्या काळात तरी उपलब्ध नाहीय. अशा परिस्थितीत, वारविक युनिर्व्हसिटीतील संशोधन रूग्णांसाठी दिलासादायक ठरू शकेल.

4. प्युरिनच्या माहितीवरून स्ट्रोकचा धोक टाळला जाऊ शकेल
डॉ.बट्ट यांच्या माहितीनुसार, रक्तामध्ये प्युरिन घटक किती प्रमाणात आहे?, याची माहिती सेन्सरद्वारे मिळाल्यास रूग्णांना याचा बराच फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना भविष्यात ब्रेन स्ट्रोकचा त्रास होण्याची शक्यता आहे किंवा जी लोक ब्रेन स्ट्रोकचा सामना करत आहेत, अशा रूग्णांना सेन्सर यंत्राद्वारे सतर्क करण्यास मदत होऊ शकते. एवढंच नाही तर अगदी वेळेमध्ये या रूग्णांवर उपचारदेखील होऊ शकतील.

5. ब्रिटनमधील 85% प्रकरणांमध्ये रक्ताच्या गाठींमुळे स्ट्रोक   
ब्रिटनमध्ये दरवर्षी ब्रेन स्ट्रोकची जवळपास 1 लाख प्रकरणं समोर येतात. यामध्ये 85 टक्के इश्केमिक स्ट्रोकच्या प्रकरणांचा समावेश असतो. इश्केमिक म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने रक्तवाहिनीत गाठी तयार होऊन रक्त पुरवठ्यास अडथळा निर्माण होतो.
संशोधकांच्या माहितीनुसार, रक्ताच्या गाठी होऊ नये, यासाठी योग्य औषधोपचार करुन ब्रेन स्ट्रोकच्या त्रासापासून रूग्णांचा बचाव केला जाऊ शकतो. ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये अनेकदा मायग्रेन आणि मेंदूमध्ये संसर्ग होणे, यांसारखी लक्षणंही आढळून येतात. पण, या लक्षणांच्या आधारे ब्रेन स्ट्रोकबाबतची माहिती मिळवणं बऱ्याचदा कठीण ठरते. पण वारविक युनिर्व्हसिटीतील संशोधकांनी तयार केलेल्या सेन्सरच्या मदतीनं ब्रेन स्ट्रोकचा धोका आहे की नाही?, याची पडताळणी अगदी काही मिनिटांमध्येच होणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.

6. स्ट्रोकचे प्रकार 
अ. इश्केमिक म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्याने रक्तवाहिनीत गाठी तयार होऊन रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होतो.
ब. हेमरेजिक म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने आलेला स्ट्रोक 

7. स्ट्रोकची लक्षणं 
- शरीराची एक बाजू बधीर होणे
- बोलण्यास अडथळा येणे
- चालताना त्रास जाणवणे
- थकवा जाणवणे
- एका किंवा दोन्ही डोळ्यांनी नीट न दिसणे
- तीव्र डोकेदुखी  
- शुद्ध हरपणं 
 

Web Title: new sensor based blood test to prevent people having brain stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.