मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 07:56 PM2018-08-17T19:56:54+5:302018-08-17T19:58:33+5:30

मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेआमपणे  समाजात बोलले जात नाही. त्यामुळे असलेल्या अज्ञानाचा परिणाम स्त्री'च्या आरोग्यावर तर होतोच पण सर्वांनाच त्या नैसर्गिक बदलाचा तिरस्कार वाटायला लागतो.

menstrual cycle is not disease, accept it as a natural process | मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा 

मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा 

googlenewsNext

पुणे : मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेआमपणे  समाजात बोलले जात नाही. त्यामुळे असलेल्या अज्ञानाचा परिणाम स्त्री'च्या आरोग्यावर तर होतोच पण सर्वांनाच त्या नैसर्गिक बदलाचा तिरस्कार वाटायला लागतो.मासिक पाळी विषयीच्या समज-गैरसमाजांविषयी स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ शुभदा देऊस्कर यांच्याशी केलेली ही बातचीत.

मासिक पाळी म्हणजे नेमके काय होते ?

मुळात मासिक पाळी हा काही आजार नाही. ती शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात अंडाशय आणि गर्भाशय यात मोठ्या घटना घडत असतात. दर महिन्यात बीज स्वीकारून गर्भ राहण्यासाठी गर्भाशय तयार होत असते. अशावेळी ते बीज गेले नाही तर त्यासाठी तयार केलेला पडदा नैसर्गिकरीत्या तुटतो आणि मासिक स्त्रावाच्या मार्गाने बाहेर पडतो. तीच प्रक्रिया मासिक पाळी म्हणून ओळखली जाते.

सॅनिटरी नॅपकिन (पॅड), कापड की मेन्स्ट्रल कप यापैकी योग्य काय आहे?

रक्तस्त्राव होत असताना सॅनिटरी नॅपकिन वापरणेच योग्य आहे. पूर्वी काही ठिकाणी कापड वापरले जायचे. मात्र ते कापड स्वच्छ करणे, उन्हात वाळवणे शक्य असेल तरच ते घेणे योग्य आहे. अन्यथा मासिक पाळीच्या काळात झालेला संसर्ग वाढून तो गर्भाशयापर्यंत जाऊन प्रसंगी गर्भ राहण्यातही अडचण येऊ शकते. आजकाल बाजारात मेन्स्ट्रल कप  आले आहेत. मात्र ते कुमारिकांना वापरता येत नाहीत.कप थेट योनीमार्गात घालायचे असल्याने योग्य व्यक्तीकडून ते कसे वापरायचे याचे ज्ञान तज्ज्ञ व्यक्तीकडून घ्यायला हवे. 

त्या काळात पोट दुखते म्हणून पूर्ण आराम करावा का ?

मासिक रक्तस्त्राव अधिक होत असेल किंवा प्रमाणापेक्षा अधिक पोट दुखत असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणेच योग्य आहे. घरी बसून किंवा काम थांबवून, एकाच जागी स्थिर राहून वेदना कमी होत नाहीत. अशावेळी दिनक्रमावर परिणाम न करून घेता आपली कामे सुरु ठेवावीत. विशेषतः सतत वेदनाशामक गोळ्यांचे सेवन टाळावे.याकाळात काही महिलांची चिडचिड होते. त्याला हॉर्मोनल डिस्टर्बन्स म्हणतात.  मात्र हे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगवेगळे असू शकतात.  

या काळात आहार काय असावा ? काही विशिष्ट्य पदार्थांचे सेवन करावे का ?

 या काळात एकाच प्रकारचे अन्न खायचे किंवा विशिष्ट जेवायचं असं काहीही नाही. उलट भरपूर हिरव्या भाज्या, सॅलड, कोशिंबीर, वरण-भात  असा चौरस आहार घ्यावा. हलका व्यायाम करावा. मासिक पाळी आजार न मानता तिचा आनंदाने आणि वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकार करायला हवा. त्या  दिवसात एका जागी बसून चिडचिड करत बसण्यापेक्षा तिचा स्वीकार करून ते चार दिवस अधिक सुसह्य बनवता येऊ शकतात. 

मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेणे कितपत योग्य आहे ?

काही ठिकाणी पूजा किंवा व्रत-वैकल्यांसाठी पाळी लांबवली जाते.कारण तितके महत्वाचे असेल तर काहीवेळा हरकत नाही. मात्र यात वारंवारता नसावी.शिवाय मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेणे चुकीचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांचाच सल्ला घ्यायला हवा. तसे न केल्यास भविष्यात मासिक पाळीचे चक्र बिघडण्याचा धोका असतो.

Web Title: menstrual cycle is not disease, accept it as a natural process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.