जीवनसत्त्व, खनिजांचं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 01:24 AM2018-12-10T01:24:56+5:302018-12-10T01:25:12+5:30

सध्या बाजारात सगळ्या जीवनसत्त्व आणि खनिजे यांच्या गोळ्या मिळतात.. उत्तम आहे ... पण त्या केव्हा आणि कुणी घ्याव्यात यांचे काही ठोकताळे आहेत...

Importance of vitamins, minerals | जीवनसत्त्व, खनिजांचं महत्त्व

जीवनसत्त्व, खनिजांचं महत्त्व

googlenewsNext

- डॉ. कांचन खैराटकर

नमस्कार. मला नेहमी रुग्ण प्रश्न विचारतात की, अहो ..जीवनसत्त्व .. खनिजे यांना आहारात किती महत्त्व आहे? ... माझे उत्तर नेहमीच ठरलेले असते, अहो जेवण तेल.. तिखट... मिठाशिवाय जसे अपूर्ण ना तसेच जीवनसत्त्व.. खनिजद्रव्याशिवाय अपूर्णच बरं का! आपण खाल्लेल्या आहाराचे उत्तम पचन यांच्यामुळे तर होतेच आणि शरीराचे पोषणही होते... चला यांच्याविषयी आज जाणून घेऊयात का !

सध्या बाजारात सगळ्या जीवनसत्त्व आणि खनिजे यांच्या गोळ्या मिळतात.. उत्तम आहे ... पण त्या केव्हा आणि कुणी घ्याव्यात यांचे काही ठोकताळे आहेत... स्वस्थ राहण्यासाठी आहारात या जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. दूध घेऊन जे समाधान मिळेल... लिंबू सरबताने जी तृप्ती मिळेल अथवा गाजराच्या हलव्याने ते तोंडाला पाणी सुटेल ते कोणत्याही गोळ्यांनी मिळेल का ?
सर्वप्रथम हे मान्य करायला हवे की पावभाजीचा सुवास आजही सर्वांना खेचून घेतो... गरमागरम वाफाळलेली इडली पाहूनच तोंडाला पाणी सुटते... आणि आल्याचा चहा तर परमप्रियच! म्हणूनच पेल्यातून वाटीत फिरणारा... अगदी रस्त्यावरील चहाची चव सर्वांना आपलीशी वाटते... का बरे! कारण या भारतीय भावना आहेत... आपल्या भावना आहेत.. आणि त्यांचा विचार करून आपल्याकडे पारंपरिक आहाराची बांधणी झाली... मग तो शाकाहार असो अथवा मांसाहार... त्यातील प्रत्येक घटकाने शरीराचे आणि मनाचे पोषण व्हायला हवे...
असे हे तृप्तीचे... आणि पोषणाचे कामही जीवनसत्त्व आणि खनिजे करतात बरं का! चला बघूयात आजचे पहिले जीवनसत्त्व.
आज आपण अ जीवनसत्त्व जाणून घेऊ.. आज एका सेकंदात मोबाईलमध्ये याची माहिती मिळेल पण मग १० जणांत ९ जणांना चष्मा... ताण असह्य होणे... असे का व्हावे ? कारण कुठेतरी पोषण कमी पडते आहे.

ढोबळमानाने दूध... हिरव्या पालेभाज्या... गाजर ... नारंगी किवा पिवळ्या रंगाच्या भाज्या यामध्ये अ जीवनसत्त्व मिळते... पूर्वी रानातील माळव म्हणजे भाजी हो! आणि रवाळ घट्ट दूध ... तरीही कसदार शरीर आणि पिळदार बांधा ... आणि चातकाची नजर होती...
असो ... पण आता काही बदल करून बघूयात की! गाजरहलवा... गाजराचे लोणचे... पुलाव ... पुऱ्या... पराठे.... खीस... असे किती पदार्थ होतील ना ! जेवताना चार तुकडे गाजर खाणे किंवा एखादी संत्र्याची फोड म्हणजे चौरस आहार का? हा प्रश्न स्वत:ला विचारा म्हणजे खरेखुरे उत्तर मिळेल... रसरशीत, आवडीने आणि श्रद्धापूर्वक खाणे महत्त्वाचे आहे.

खूप तणाव असतील... व्यायाम खूप केला असेल... विमानाचा प्रवास... दगदगीचा व्यवसाय असेल तर अ जीवनसत्त्व अत्यावश्यक आहे... यालाच कॅरोटीन म्हटले तरीही चालेल.. त्यामुळे दृष्टी उत्तम राहते... प्रजननसंस्था उत्तम राहते... कॅन्सरला प्रतिबंध होतो आणि चेहरा सतेज होतो... पारंपरिक आहार सर्वसमावेशक आहे... त्याचा सन्मान आणि स्वीकार नक्कीच आरोग्यदायी आहे
(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत)

Web Title: Importance of vitamins, minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.