पावसाळ्यात माश्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 09:36 AM2019-07-02T09:36:33+5:302019-07-02T09:37:32+5:30

पाऊस सुरू झाल्यावर माश्या-मच्छरांचाही त्रास वाढतो. माश्यांमुळे अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं.

How to keep flies away from home in monsoon | पावसाळ्यात माश्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खास टिप्स!

पावसाळ्यात माश्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खास टिप्स!

Next

पावसाळा आला की सोबत खूप काही घेऊन येतो. काही चांगल्या गोष्टी तर काही वाईट गोष्टी पावसासोबत आपसूकच येतात. मोठ्या प्रमाणात रोगराई येते. त्यासोबतच माश्या-मच्छरांचाही त्रास वाढतो. माश्यांमुळे अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. मोठ्यांना तर याचा त्रास होतोच पण लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. 

माश्या बाहेरून घरात रोगजंतू घेऊन येतात. अन्नावर, पाण्यावर बसल्या की त्याने आपल्याला रोगांचा सामना करावा लागतो. यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. अशात यापासून कसे वाचावे किंवा या माश्यांपासून सुटका कशी मिळवावी यासाठी काही खास टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

पावसाळ्यात माश्या होतातच. त्यापासून सुटकाही मिळवता येते मात्र त्यासाठी काही काळजी घ्यावी लागणार आहे. या माश्या चावत जरी नसल्या तरी अंगावर बसल्याने जो त्रास होतो त्यापासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करावेच लागतील.

* स्वच्छता:

घरात सर्वात जास्त जर माश्या कुठे येत असतील तर त्या किचनमध्ये असतात. त्यामुळे किचनमध्ये काहीही घाण ठेवू नये. किचन सतत स्वच्छ करत रहावं. उघड्यावर खाण्याच्या वस्तू ठेवू नये. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने ओटा स्वच्छ ठेवा. अन्न सांडवू नका. सांडल्यास ती जागा लगेच स्वच्छ धुवून घ्या. त्यासोबत घरातील कचरा उघडा ठेवू नका. शक्यतो तो लवकर बाहेर टाका. अन्न झाकून ठेवा.

* खिडक्या दारं बंद करा:

पावसाळ्यात शक्यतो घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा. बाहेरून आल्यावर पाय निट स्वच्छ धुवा. किंवा खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा. यामुळे तुम्ही खिडक्या अधिक वेळ उघड्या ठेवू शकता.

* इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा:

घरात कीटकांचा वावर कमी करण्यासाठी इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा. मात्र त्याचा वापर करताना घरातील लहान मुलं तसेच खाण्याचे पदार्थ दूर ठेवा. बाजारात आणखीही काही केमिकल्स मिळतात ते वापरा. पण लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा. 

* घरगुती उपाय:

कापूर, तुळस, कडूलिंब, तेल : धार्मिक कार्यामध्ये कापूर वापरला जातो. संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा. कापराच्या दर्पामुळे माश्या कमी होण्यास मदत होते. घरा-घरात किमान तुळशीचं रोप जरूर आढळतं. तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत कीटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. 

घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो. त्यासोबतच निलगिरी, लव्हेंडर, पेपरमिंट, गवती चहा यासारखी नैसर्गिक तेलांनी कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते. या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्ब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक असतात तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

Web Title: How to keep flies away from home in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.