या आजारांवरील रामबाण औषध आहे माती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 04:12 PM2018-11-18T16:12:53+5:302018-11-18T16:17:47+5:30

नेचुरोपॅथीमध्ये आजार बरे करण्यासाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर केला जातो. नेचुरोपॅथीमधील उपचाराची एक पद्धत म्हणजे मड थेरेपी होय.

Health Tips : Mud therapy is Useful in many disease | या आजारांवरील रामबाण औषध आहे माती

या आजारांवरील रामबाण औषध आहे माती

googlenewsNext

 नैसर्गिक उपचार पद्धती अर्थातच नेचुरोपॅथीकडे हल्ली लोकांचा कल वाढत आहे. नेचुरोपॅथीमध्ये आजार बरे करण्याबरोबरच त्यांना शरीरातून समूळ नष्ट करण्यावर भर दिला जातो. या उपचारपद्धतीमध्ये आजार बरे करण्यासाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर केला जातो. नेचुरोपॅथीमधील उपचाराची एक पद्धत म्हणजे मड थेरेपी होय.  

मातीमध्येही विविध औषधी गुण असतात हे आता सिद्ध झाले आहे. औषधी गुणधर्म असलेल्या मातीचा वापर करून करण्यात येणारी मड थेरेपी ही अनेक आजारांवरील रामबाण इलाज मानला जातो. माती ही प्रकृतीच्या पाच प्रमुख  तत्त्वांपैकी एक आहे. उपचारांमधील मातीच्या वापरामुळे आरोग्य सुधारण्यास आणि आजार बरा करण्यास मदत मिळते.  

नैसर्गिक उपचारपद्धतींमध्ये मातीचा उपयोग अनेक आजारांच्या इलाजासाठी प्राचीन काळापासूनच केला जात आहे. मड थेरेपीसाठी जमिनीमध्ये तीन ते चार फूट खाली मिळणाऱ्या मातीचा वापर केला जातो. या मातीमध्ये दगड किंवा अन्य कुठल्याही प्रकराचे अशुद्ध घटक राहू नयेत यासाठी ही माती चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेतली जाते.  

मड थेरेपीचे फायदे आणि वापर 

मातीचा वापर करून करण्यात येणाऱ्या मड थेरेपीचे अनेक फायदे आहेत. मड थेरेपीच्या माध्यमातून शरीरातील उष्णता, डोकेदुखी, अपचन, उच्च रक्तदाब यासारखे अनेक आजार बरे करण्यात मदत मिळते.  जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर माती पाण्यात भिजवून डोक्याला लावावी. ही माती किमान अर्ध्या तासापर्यंत डोक्यावर ठेवावी, त्यामुळे तुम्हाला डोकेदुखीमधून त्वरित आराम मिळू शकतो. 

अपचनाची समस्या असल्यास मातीचे तुकडे करून पोटावर लावावेत. हे तुकडे 20 ते 30 मिनिटांपर्यंत तसेच ठेवावेत. सातत्याने असे केल्याने तुमच्या पोटातील विकार दूर होतील. महात्मा गांधीसुद्धा पोट व्यवस्थित ठेवण्यासाठी मड थेरेपी वापरत असत. 

जुलाब होत असतील तर त्यावरील उपचारांसाठीही मड पॅक उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. जुलाब झाल्यास मड पॅक पोटावर लावले जाते. तसेच उलट्या होत असतील तर मड पॅक छातीवर लावावे. त्यामुळे उलट्या होणे बंद होते.  

काही लोकांना शरीरातील उष्णतेची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. अशा परिस्थितीत त्यांच्या हातामध्ये आणि शरीरात आग होत असल्याचा अनुभव त्यांना येतो. हा आजार दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मड थेरेपी होय. माती शरीरातील उष्णता खेचून घेते. त्यामुळे मड थेरेपी केल्यानंतर अशा व्यक्तीला त्वरित आराम पडतो. 

चांगल्या प्रकारे स्वच्छ करणाऱ्या मुलतानी मातीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. मुलतानी माती मुरुमांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच त्वचेला चमकदार करण्यासाठी उपयुक्त ठरते.  

माती शरीरातील विषारी द्रव्यांना शोषून घेते, त्यामुळे शरीरातील त्वचेसंबंधीचे आजारही दूर होतात. तसेच दीर्घकाळापासून असलेली त्वचेसंबंधीची अॅलर्जीसुद्धा मड थेरेपीद्वारे दूर केली जाऊ शकते.  
 

Web Title: Health Tips : Mud therapy is Useful in many disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.