-निशांत महाजन

सोशल जेट लॅग. अशी एक नवीनच संकल्पना गेल्या आठवड्यात चर्चेत होती. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तर ती खूपच गाजली. त्यावर अनेकांनी लगेच लेख लिहिले, अनेक ग्रूप्समध्ये या विषयांवर चर्चा तापली.
मुद्दा काय, हा सोशल जेट लॅग असतो काय हा?
शब्दांवरुन असं वाटू शकेल की हे प्रकरण काहीतरी सोशल मीडीयाशीच संबंधित असलं पाहिजे पण ते तसं नाही. सोशल मीडीयाशी संबंधित नसूनही गेल्या आठवड्यात सोशल मीडीयात या विषयाची प्रचंड चर्चा झाली.
कारण सोशल मीडीया वापरणारे बहुसंख्य आपण या सोशल जेट लॅगच्या त्रासानं बाधीत आहोत की काय हे तपासून पाहू लागले.
त्याच्या मुळाशी आहे, सध्याचं विकेण्ड कल्चर. आठवड्याचे पाच दिवस मरमर काम करायचं. रात्रीबेरात्री झोपायचं, सकाळी उठून पुन्हा आॅफिस. सोशल लाइफ फक्त आॅनलाइनच उरलेलं असतं. त्यात झोप होत नाही. म्हणून मग अनेकजण सुटीच्या दिवशी खूप झोपतात. दुपारी उठतात. जेवतात. पुन्हा झोेपतात. पण या अती झोपण्यानं शरीराचं घड्याळ बिघडतं, हार्ट अटॅकची शक्यता वाढते असं एका अभ्यासात समोर आलं आहे. आणि त्यालाच म्हणतात सोशल जेट लॅग. प्रवास करुन आल्यावर जशी झोप उडते, शरीराचं झोपेचं चक्र बिघडतं तसंच हे चक्र विकेण्डला बिघडतं. आणि मग त्यातून अनेक व्याधी सुरु होतात.
या सोशल जेट लॅगची खूप चर्चा सोशल मीडीयातही गाजली. अनेकजण आपापले अनुभव शेअर करत मध्यरात्रीपर्यंत जागले. लवकर निजे, लवकर उठे हेच बरोबर होतं असं म्हणत अनेकजणांनी झोपेच्या वेळा पाळायचं ठरवलं.
मात्र तसं सारं काही प्रत्यक्षात येईल का?
हाच खरा प्रश्न आहे.
कारण ते सध्या प्रत्यक्षात येत नाही. आणि सोशल मीडीयाच्या अती वापरामुळेच अनेकजण रात्री बेरात्री जागेच असतात. झोपेतून जाग आली तरी तेवढ्या रात्री व्हॉट्सअ‍ॅप चेक करतात. त्यावर काहीबाही वाचून अस्वस्थही होतात.
हे सारं असंच चालू राहिलं तर आपला झोपेचं खोबरं होणं अटळ आहे. आणि त्याचे तब्येतीवरचे दुष्परिणाम?
ते तर आजही होत आहेतच..