भूक लागल्यावर पोटभरीचं खायला मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण खाण्यापेक्षा असं पोटभरीचं प्यायला मिळालं तर... असं ड्रिंक म्हणजे फ्रिकशेक्स.

आॅफिसमध्ये भूक लागली किंवा शॉपिंगला गेल्यावर भूक लागली तर आपसूकच खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे आपली पावलं वळतात. मग ठिकाण पाहून पदार्थ खाल्ले जातात. आणि खाताना एखादं पेय तर हल्ली मस्टच. लोकांची हीच आवड लक्षात घेत खाद्यपदार्थांबरोबरीने पेयांचेही विविध प्रकार मिळणारे कॅफे, लाऊंज सध्या तुफान चालत आहेत. तिथले काही प्रकार पितापिता त्यातले पदार्थही तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे दुसरी वेगळी डिश मागवण्याची गरजच उरत नाही. हा पितापिता खाऊही घालणारा भन्नाट प्रकार म्हणजे फ्रिकशेक्स.
फ्रिकशेक्स हा प्रकार दोन वर्षांपूर्वी आॅस्ट्रेलियातल्या एका टीव्ही शोमुळे तिकडे फारच लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याचे लोण जगभरात पोहोचायला लागले. फ्रिकी म्हणजे झोप उडवणारे असा त्याचा मूळ अर्थ. ग्लासमध्ये कुठलीही सजावट न करता भरभरून आणि ताळमेळ नसलेले कुठलेही म्हणजे कुठलेही पदार्थ त्यात देता येतात. मिल्कशेकची ही पुढची पायरी आहे असे म्हटले तरी चालेल.
याविषयी शेफ निरज लवाटे म्हणाला, सध्या या फ्रिकशेक्सची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. हे पेय करताना मोठ्या ग्लासमध्ये आतमधून चॉकलेट सॉसचं कोटिंग करतात.
आतमध्ये पाहिजे त्या फ्लेवरचं मिल्कशेक असते. त्यावर आइसक्रीमचा भलामोठा स्कूप, व्हीप क्री, वर आॅरियो बिस्कीट, चॉकलेटचा स्ट्रो, जेम्स, कॅडबरी, मार्शमेलोज, वफल्स, केक ते पॉपकॉर्नपर्यंत वाट्टेल ते भरपूर भरलेलं असतं. ते बघूनच आ वासला जातो. आणि हे सगळं एकट्यानं कसं प्यायचं असं होऊन जातं. एवढा मोठ्ठा भरलेला जार दोन माणसं सहज पिऊ शकतात. भन्नाट काहीतरी प्यायला मिळत असल्याने त्याची क्रेझ तरुणाईमध्ये जास्त असल्याचे निरजने सांगितले.
सध्या मुंबई आणि उपनगरात निवडक हॉटेल्समध्ये मिळणारे हे शेक्स ३५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. किंमत बघून चकित व्हायला होतंच; पण याची मजा ते प्यायलाशिवाय कळणारच नाही! वेगळा प्रकार म्हणून हे फ्रिकशेक्स नक्की पिऊन बघा.

भक्ती सोमण