रक्तदाब घटणे धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 08:37 PM2019-01-12T20:37:41+5:302019-01-12T20:46:53+5:30

रक्तदाब वाढल्याने त्रास तर होतोच, पण रक्तदाब घटल्यानेही त्रास होतो. याची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. तशी कमी रक्तदाबाची खास व्याख्या केलेली नाही. हृदयाच्या आकुंचन व प्रसरणाच्या वेळी मोजलेला रक्तदाब १०० ते १५० व ६० ते ९० मि.मी. ऑफ मर्क्युरी हा साधारणपणे आढळतो. यापेक्षा कमी रक्तदाब म्हणजेच आकुंचन व प्रसरण पावतानाचा रक्तदाब साधारणपणे १०० व ६० मि.मी. ऑफ मर्क्युरी असणे कमी रक्तदाबाचे लक्षण ठरले. याला हायपोटेन्शन म्हणतात तसे पाहता कमी रक्तदाब हा काही आजार नाही तर हे परीक्षण आहे. तरुणात व मध्यमवयीन महिलांमध्ये कमी रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते.

Decrease of blood pressure is danger | रक्तदाब घटणे धोक्याचे

रक्तदाब घटणे धोक्याचे

googlenewsNext
ठळक मुद्देतरुण व मध्यमवयीन महिलांमध्ये कमी रक्तदाबाचे प्रमाण अधिक

रक्तदाब वाढल्याने त्रास तर होतोच, पण रक्तदाब घटल्यानेही त्रास होतो. याची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. तशी कमी रक्तदाबाची खास व्याख्या केलेली नाही. हृदयाच्या आकुंचन व प्रसरणाच्या वेळी मोजलेला रक्तदाब १०० ते १५० व ६० ते ९० मि.मी. ऑफ मर्क्युरी हा साधारणपणे आढळतो. यापेक्षा कमी रक्तदाब म्हणजेच आकुंचन व प्रसरण पावतानाचा रक्तदाब साधारणपणे १०० व ६० मि.मी. ऑफ मर्क्युरी असणे कमी रक्तदाबाचे लक्षण ठरले. याला हायपोटेन्शन म्हणतात तसे पाहता कमी रक्तदाब हा काही आजार नाही तर हे परीक्षण आहे. तरुणात व मध्यमवयीन महिलांमध्ये कमी रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते.
हृदय हे आपल्या चार कप्प्यांद्वारे शुद्ध व अशुद्ध रक्त आकुंचन व प्रसारणाच्या माध्यमातून एका मिनिटात संपूर्ण शरीरातील अवयवात रक्तप्रवाह चालू ठेवते. प्रत्येक पेशी व पेशी समूहास कार्यरत राहण्यासाठी रक्ताची नितांत आवश्यकता असते. केवळ रक्तदाबामुळेच रक्त इकडून तिकडे व तिकडून इकडे ने-आण करण्याची प्रक्रिया सहज शक्य होते. रक्तदाबात होणाऱ्या बदलामुळे अवयवांना होणाऱ्या रक्तपुरवठ्याची मात्रा कमी-जास्त होते व त्यामुळेच अवयव नीटपणे सुरळीत काम करू शकत नाहीत. काही लोक बोलताना म्हणतात की, मला रक्तदाब नाही. वैज्ञानिकदृष्ट्या हे विधान चुकीचे आहे. याचे कारण त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा आजार नसेल अथवा कमी रक्तदाबाची लक्षणे दिसत नसतील, पण शरीरातील अवयवांचा क्रियाशीलतेसाठी सामान्य माणसातदेखील रक्तदाब असणे स्वाभाविक आहे. म्हणून हायपरटेन्शन (जास्त) व हायपोटेन्शन (कमी) नाही असे म्हणणे संयुक्तिक व योग्य वाटते.
रक्तदाब घटण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. हृदयाच्या डाव्या कप्प्यातून शुद्ध रक्त बाहेर फेकण्याचे प्रमाण कमी होणे आणि दुसरे कारण नीला आणि रोहिणी या रक्तवाहिन्यात रक्तदाब सुरळीत चालू ठेवणारी पद्धत यात बिघाड असणे हे आहे. याचाच अर्थ असा की, रक्तातील पेशी व स्त्राव यापैकी स्त्रावाचे (प्लाजमा) प्रमाण घटणे आणि नीला व रोहिणीचा अखंड प्रवाह चालू ठेवण्याची ताकद कमी होणे होय. ज्यामुळे हृदयाच्या डाव्या कप्प्यातील शुद्ध रक्त बाहेर फेकण्याचे प्रमाण घटते. त्याला लोआऊटपुट असे म्हणतात. याचे मुख्य लक्षण म्हणजेच रक्तदाब घटणे होय.
रक्तदाबाचे प्रकार- १) क्रॉनिक हायपोटेन्शन (दीर्घ मुदतीचा कमी रक्तदाब) या प्रकारच्या रक्तदाबात नेहमीच व्यक्तीचा रक्तदाब कमी असल्याचे निष्पनन होते. या प्रकारच्या व्यक्तींना सहसा कुठला त्रास जाणवत नसल्याने ते बिगर लक्षणाचेच जगत असतात. एकदा त्यांच्या लक्षात त्यांना कमी रक्तदाब असल्याचे आणून दिल्यावर त्यांना आळस येणे, अशक्तपणा, चक्कर येणे आदी त्रास जाणवू लागतो.
२) अक्यूट हायपोटेन्शन (तात्कालिक कमी रक्तदाब): बसल्या बसल्या अथवा उभ्या उभ्या अचानक रक्तदाब या प्रकारात घटतो. तात्काळ रक्तदाब घटल्याने माणसाला चक्कर येते व तो झोक जाऊन खाली पडतो, गयावया करतो.हा त्रा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रक्तस्राव जास्त होणे, संडासावाटे अथवा उलटीवाटे स्राव बाहेर पडणे; ज्यामुळे शरीरातील पाणी व क्षाराचे प्रमाण घटते. हृदयविकाराचा झटका येणे अथवा कुठल्याही कारणास्तव रुग्ण शॉकमध्ये जाऊन बेशुद्ध होणे.
३) पोश्चरल हायपोटेन्शन शरीराच्या विविध अवस्थेनुसार रक्तदाब घडतो. बसून उठल्यावर वा झोपून उठल्यावर रक्तदाबात फरक जाणवतो. त्याला पोश्चरल कमी रक्तदाब म्हणतात. साधारणपणे झोपेतून उठूनउभे राहिल्यावरचा रक्तदाब २० मि.मी. ऑफ मर्क्युरी अथवा त्यापेक्षा जास्त घटला असल्यास त्याला पोश्चरल हायपोटेन्शन म्हणता येईल. शरीराच्या हालचालीमुळे बदलणारा व कमी होणारा हा रक्तदाबाचा प्रकार आहे. या प्रकारचा त्रास शरीरातील स्वयंकेंद्रित मज्जातंतू संस्थेतील गडबडीमुळे होऊ लागतो.
कुपोषण (मालन्यूट्रिशन), जास्त दिवस लागलेले संडास, कर्करोग किंवा इतर दीर्घ आजारामुळेमाणूस दुबळा होऊन सडपातळ होणे (कॅकेझिया) किंवा जास्त दिवस अंथरुणावर पडून राहिल्याने दीर्घ मुदतीचा कमी रक्तदाब जडतो जो काही प्रकरणात आनुवंशिकदेखील असतो. शरीराच्या विविध हालचालींमुळे घटणारा रक्तदाब हा कालांतराने दीर्घमुदतीचा कमी रक्ताब होतो. जास्त वेळ एकाच अवस्थेत उभे राहिल्याने, खूप दिवसांनी दीर्घ आजारातून अंथरुणातून उठल्यावर व जास्त परिश्रम केल्यावर थोड्या वेळासाठी रक्तदाब घटू शकतो. याचे कारण दीर्घ काळामुळे पायांच्या नीलांमध्ये रक्त साठल्याने हृदयाच्या डाव्या कप्प्यातील रक्ताचे प्रमाण घटते व रक्तदाब कमी होतो. मधूमेहाच्या रुग्णात, जीवनसत्त्व कमी असणाऱ्यात व मेनिनजायटीस (मेंदूच्या आवरणाचा आजार) या प्रकारच्या रुग्णात जास्त काळ कमी रक्तदाब आढळतो. रक्तदाब नियंत्रण करणाऱ्या गोळ्या जास्त प्रमाणात झाल्यानेही रक्तदाब घटतो. तो औषधाचे प्रमाण घटविल्यावर पूर्ववत होतो.
काहीच कारण अथवा आजारा नसतानाही रक्तदाब घटू शकतो. त्याला इडियोपॅथिक, हायपोटेन्शन म्हणतात. वृद्धापकाळात मेंदूच्या मज्जारजू पेशींची झीज झाल्याने घाम कमीयेणे. नपुंसकता याबरोबरच रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येणे आदी कारणे दिसतात.
कमी झालेला रक्तदाब तसा सहसा निदर्शकास येत नाही. त्यामुळे तो घटत राहतो. दैनंदिन व्यवहारात इतर कुठल्या तरी कारणास्तव रक्तदाब तपासला व रीडिंग कमी आढळली तर या कमी रक्तदाबाचे निदान होते. रक्तदाब तात्काळ घटल्याने नाडी कमी लागते व त्याचा दर पण कमी होतो. मळमळ होऊन घाम येऊ लागतो व चक्कर आल्याने व्यक्ती फिरू लागते व शेवटी बेशुद्ध होऊन शॉकमध्ये जाऊ शकते. रोगनिदान करण्यासाठी झोपून व उभे रक्तदाब दोन-तीन वेळा मोजण्याची गरज भासते. रुग्णाचा वैद्यकीय अहवाल जाणून घेतल्यावर कमी रक्तदाबाचे खरे कारण कळून निदान करणे सोपे जाते.
उपाय- आनुवंशिकतेने सातत्याने कमी रक्तदाब विनात्रासाने राहू शकतो. जेवण झाल्यावर, गरम पाण्याने स्नान केल्यावर व जास्त घामामुळे रक्तदाब घटतो. रोग्याला हे नीट समजावून ज्यामुळे त्रास होतो ते टाळण्याचे सांगणे योग्य आहे. ब्रेन ट्यूमर (मेंदूची गाठ) अथवा इतर कुठल्या आजारामुळे होणारा कमी रक्तदाब त्या आजाराच्या इलाजामुळे ठीक होतो. तत्काळ रक्तदाब घटण्याचे निश्चित कारण शोधून त्याप्रमाणे औषधी देणे व उपचार करणे फायद्याचे ठरते. जसे हृदयाचा झटका आला तर अतिहृदय दक्षता विभागात त्या रुग्णावर तातडीचे उपचार करणे गरजेचे आहे. भयानक प्रसंग अथवा अपघात बघितल्याने घटणारा रक्तदाब त्या रुग्णास झोपवून, पायाकडचा भाग उंच करून व गरज भासल्यास अट्रोपोमचे इंजेक्शन देऊन बरा केला जाऊ शकतो.
हालचालींमुळे घटणारा रक्तदाब सकाळी झोपेतून उठल्यावर त्रासदायक ठरू शकतो. यासाठी झोपेतून उठण्यापूर्वी डोके उंचावून थोडा वेळ झोपून राहणे व नंतर हळूहळू उठणे हा सल्ला उपयोगी पडतो. पायांना स्टॉकिंग बांधणे अथवा पोटाला पट्टा आवळणेही उपयुक्त ठरते. जेवणात जास्त मीठ असणेही लाभदायक ठरते. जे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना घातक ठरते. याबरोबर स्टेरॉइडची गोळीही दिली जाऊ शकते. ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून रक्तदाब साधारण ठेवण्यासाठी मदत होते. घटलेला रक्तदाब वेळीच लक्षात आल्यावर वेळीच प्रतिबंध करून योग्य उपचार करणे हिताचे ठरते.

-डॉ. रोहिदास वाघमारे (निवृत्त कार्डिओलॉजिस्ट), जे. जे. रुग्णालय, मुंबई.

Web Title: Decrease of blood pressure is danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.