कॅन्सर के आगे जीत है!  फक्त ही पाच सूत्रं हाताशी हवीत!

By Madhuri.pethkar | Published: February 3, 2018 05:51 PM2018-02-03T17:51:34+5:302018-02-03T18:10:57+5:30

4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो. कॅंन्सर म्हणजे शेवट हेच समीकरण अनेकांच्या मनात पक्कं झालेलं. पण हे समीकरण खोटं ठरू शकतं. त्यासाठी कॅन्सरकडे बघण्याची दृष्टी, त्याच्याशी दोन हात करण्याची पध्दत बद्लावी लागते इतकंच. कॅन्सर बरोबर सकारात्मकता  हे समीकरण जर प्रत्येक टप्प्यावर ठेवलं तर कॅन्सरशी लढणं, कॅन्सरसोबत जगणं खूप सहज आणि आनंददायी होतं. अशा लढाईसाठी आवश्यक असेलल्या सूत्रांची चर्चा करणारा हा लेख खास जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने.

Cancer- Is the victory ahead! Only these five formulas should be implemented! | कॅन्सर के आगे जीत है!  फक्त ही पाच सूत्रं हाताशी हवीत!

कॅन्सर के आगे जीत है!  फक्त ही पाच सूत्रं हाताशी हवीत!

googlenewsNext
ठळक मुद्दे* कॅन्सरचा रूग्ण हा पावलोपावली खचत असतो. म्हणूनच कौटुंबिक, सामाजिक पातळीवर त्यांना उभारी देणारे संकेत मिळाले, स्वत: रूग्णानं निराशेतून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले तर कॅन्सरच्या पहिल्याच पावलावर भेटणारा निराशावाद तिथेच हारतो आणि संपतोदेखील. * कॅन्सरसारख्या आजारात जोडीदाराची सोबत, त्याचा सहवास, त्याचं प्रेम, आधार या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जोडीदारासोबतची जवळीक कॅन्सरविरूध्दच्या लढाईत खूप बळ देवून जाते.  कॅन्सरवरच्या उपचारादरम्यान, उपचारानंतर स्वत:ला गुंतवून ठेवणं, मन रमवणं, स्वत:साठी आनंद निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. यासाठी आपले छंद, आपली आवड, आपल्यातली कला या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.

 


- माधुरी पेठकर

 

आयुष्यात अनेक वाईट आणि अवघड प्रसंग येतात. पण ते आले म्हणून कधी आयुष्य अडत नाही, कोणी नाउमेद होत नाही. उलट आयुष्यात हे होणारच त्याला तोंड देत पुढे जायला हवं असंच प्रत्येकजण म्हणत असतं आणि करतही असतं. हे तत्त्वज्ञान कोणालाही शिकवावं लागत नाही. प्रत्येकालाच ते जमतं. पण कॅन्सर झाला हे समजल्यावर मात्र सगळं तत्त्वज्ञान गळून पडतं. उमेद हरवते आणि कॅन्सरपलिकडे आयुष्यात दुसरं काहीच दिसत नाही. बहुसंख्य रूग्णांच्या बाबतीतही हेच होतं. 

पण खरंतर कॅन्सरविरूध्दची लढाई अगदी पहिल्या पावलापासूनच भक्कम आणि सकारात्मक असायला हवी. आपल्या शरीरातली, मनातली सर्व ताकद, इच्छाशक्ती आणि आशावाद एकवटून ती लढली जायला हवी. अर्थात हे बोलणं सोपं आहे पण करणं नाही. पण हे करणं अशक्य तर अजिबातच नाही. 
कॅन्सरला सामोरं जाणार्‍या, त्याच्याशी संघर्ष करत जगण्याचं र्मम शोधणा -या लढाईचं विशिष्ट असं सूत्र आहे. ते स्वीकारलं, समजून घेतलं तर कॅन्सरसोबतची ही लढाई यशस्वी तर होतेच शिवाय निर्थक, बेरंग, बेसूर वाटणा-या  आयुष्यात पूर्वीपेक्षा अधिक अर्थ, र्मम आणि रंग सापडतात.   

 

सूत्र 1
निराशावाद का येतो?
हे समजून घ्या आणि काम करा!

कॅन्सर मग तो कसलाही असो हा आजार झाला की रूग्णाला धक्का बसतोच.   ‘मलाच का?’  ‘मीच का?’ असा स्वत:ला हतबल आणि निराश करणारा प्रश्नही पडतोच. या आजाराचं निदान झाल्यावर आधी घरातून, घरातल्या माणसांकडून, जोडीदाराकडून येणार्‍या प्रतिक्रियांचाही रूग्णाच्या मनावर बरा वाईट परिणाम होतो. स्तनाचा कॅन्सर झालेल्या स्त्रीला जर तिच्या नव-यानं तुला कीड लागली आहे? अशी प्रतिक्रिया दिली किंवा कॅन्सर झालेल्या रूग्णाला आता उपचारासाठी आपली परिस्थितीच नाही किंवा हा आजार झाला आता काही खरं नाही अशा नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या तर मग आधीच आजाराचा धसका घेणारा रूग्ण पूर्णत: खचतो. त्याची आजाराशी लढण्याची ताकद संपते.  त्यापेक्षा  ‘आपण चांगले उपचार घेवूत’, ‘तू बरा / बरी होशील’  ‘कसलीही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत’ यासारखा आशावाद दिला तर रूग्णाला आधार मिळतो. त्यामुळे आजाराचं निदान झाल्यावर खचलेल्या रूग्णाला कशा प्रतिक्रिया मिळतात हे त्याच्या/ तिच्या पुढच्या लढाईच्या ताकदीसाठी खूप महत्त्वाचं आहे.
उपचारादरम्यान केस जातात, त्वचा काळी पडते या गोष्टींचाही नकारात्मक परिणाम होतो. विशेषत: स्त्रियांवर. केस गेल्यानंतर अडनिडवेळी स्कार्फ घालून बाहेर पडलं तर लोकं वेड्यात काढणार किंवा न घालताच बाहेर पडलं तर  ‘अरे हिला काहीच कसं वाटत नाहीये,  बोडक्या डोक्यावर काहीतर घ्यायला हवं की नको?’ असा प्रश्न विचारणार्‍या नजरा, वळवळून पाहणारी लोकं नकोसं वाटतं. कॅन्सरनं दिसण्यावर होणा-या परिणामांमुळे रूग्णांमध्ये खूप निराशा येते.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जर बेताचीच असेल तर आजारामुळे होणारी ओढाताण बघून रूग्णाच्या जीवाची घालमेल होते. आपल्यामुळेच अख्या घराला खस्ता खाव्या लागतायेत, आपल्यामुळेच खूप पैसे खर्च होताहेत असा अपराधीभाव रूग्णाच्या मनात निर्माण होतो आणि त्याचा  परिणाम आजाराला सामोरं जाण्याचं त्याच्यातलं बळ कमी होत जातं.
रूग्ण जर स्त्री असेल तर तिच्या मनात आणखी एक अपराधीभाव निर्माण होतो तो म्हणजे  ‘आपल्यासाठी सगळ्यांनी किती करावं लागतंय आणि आपण काहीच करू शकत नाहीये!’. मुलांची शाळा, अभ्यास, स्वयंपाक, औषधपाणी, घरातली मोठ्यांची काळजी या सर्व जबाबदार्‍या जोडीदारावर येवून पडतात, मुलांची आबाळ होते तेव्हा त्या स्त्रीला आजार काय पण जगणंही नकोसं होतं. 
कॅन्सरच्या आजारात ‘रिकरन्सचा’ धोका असतो.  या रिकरन्सची भीतीच रूग्णाच्या मनात दबा धरून बसते. एरवी ताप आला तरी टेन्शन न घेणारी/घेणारा कॅन्सर झाल्या नंतर मात्र साध्या सर्दीचा संबंधही कॅन्सरशी लावतो. आणि सतत घाबरलेल्या अवस्थेत असतो. 

या रिकरन्सच्या भीतीमुळेच आता आपल्या हातात किती दिवस आहेत हे माहित नाही अशीही रूग्णाची मानसिकता होते आणि हातातून कामं आणि जबाबदार्‍या  पटापट संपवण्याचा ताण रूग्णामध्ये निर्माण होतो. अकारण भीती आणि ताणाचा परिणाम म्हणूनही कॅन्सर रूग्णामध्ये नैराश्य निर्माण होतं. 
वरील सर्व कारणांमुळे कॅन्सरचा रूग्ण हा पावलोपावली खचत असतो. म्हणूनच कौटुंबिक, सामाजिक पातळीवर त्यांना उभारी देणारे संकेत मिळाले, स्वत: रूग्णानं निराशेतून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले तर कॅन्सरच्या पहिल्याच पावलावर भेटणारा निराशावाद तिथेच हारतो आणि संपतोदेखील. 
 

 

सूत्र 2
शरीर आणि मनाची  जवळीक

कॅन्सरसारखा आजार होतो तेव्हा नातेसंबंधामध्येही खूप उलथापालथी होतात. स्तनाच्या कॅन्सरमुळे जेव्हा स्त्रीला स्तन गमवावा लागतो तेव्हा स्त्रीमध्ये प्रचंड अपराधीभाव निर्माण होतो. याचा परिणाम म्हणजे ती स्त्री आणि तिच्या जोडीदारामध्ये शारीरिक अंतर निर्माण होतं. पण हे अंतर जेव्हा तसंच राहातं, वाढत जातं तेव्हा ते फक्त शरीरापुरती र्मयादित राहात नाही तर  कधीही भरून न येणारी मानसिक दरी निर्माण होते.
कधीकधी सुरूवातीला म्हणजे कॅन्सरचं निदान झाल्यावर लगेच रूग्ण स्त्री ही निराश असली तरी तिचा जोडीदार खूप आशावादी असतो. आपण लढू, बाहेर पडू असंही त्याला वाटत असतं. पण जेव्हा ऑपरेशन होवून स्त्रीचा स्तन काढावा लागतो तेव्हा त्या स्त्री इतकाच तिचा जोडीदारही हादरून जातो. ऑपरेशननंतर स्त्रीच्या देहात होणार्‍या बदलाशी अनेक पुरूष जुळवून घेवू शकत नाहीत त्यामुळेही त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक दुरावा निर्माण होतो. यासाठी ऑपरेशनआधी डॉक्टरांशी याबाबत सविस्तर बोलण्यामुळे जोडीदाराच्या मनातल्या शंका दूर होतात आणि आपल्या जोडीदारमध्ये ऑपरेशननंतर होणा-याबदलांबाबत त्याची मानसिक तयारी होते. याचा खूप चांगला परिणाम त्यांच्या नात्यावरही होवू शकतो. 
कॅन्सरचं निदान झाल्यावर रूग्णाच्या मनात निर्माण होणार्‍या नैराश्यानं, भितीमुळे आणि गैरसमजानंही  रूग्ण आणि  त्याच्या जोडीदारात अंतर पडू शकतं.  रूग्ण ही जर स्त्री असेल तर  आपल्यामुळे घरच्या जबाबदार्‍यांचा, आर्थिक ओढाताणीचा सर्व भार जोडीदारावर पडला या अपराधभावनेनं स्त्री जोडीदाराकडून येणा-या  प्रत्येक मदतीला बिचकते, नको बुवा उगाच ताण, किती करावं लागतं यांना.. यासारख्या प्रतिक्रिया मनात उमटून स्त्री नवर्‍याकडून येणार्‍या  प्रत्येक मदतीला नाकारत जाते. आणि  ‘आपण इतका पुढाकार घेतो आणि बायको नको नको म्हणते ’ याचा राग येवून पुढे पुढे पुरूषाची बायकोची मदत करण्याची इच्छा संपत जाते. यातूनही दोघांच्यात मानसिक दुरावा निर्माण होतो.
कॅन्सरमुळे नवरा बायकोमध्ये शारीरिक दुरावा ही या  नात्यातली  प्रामुख्यानं आढळून येणारी समस्या आहे. ही समस्या दोन्ही बाजूंनी निर्माण होते. आपल्यामुळे आपल्या नवर्‍याला कॅन्सरचा संसर्ग होईल या भीतीनं  रूग्ण स्त्रिया नव-याना साधा हात सुध्दा लावू देत नाही. तर अनेकदा पुरूषांच्या मनात असतं की हिला आजारपणाचा त्रास आहे, संबंधांमुळे अजून त्रास झाला तर.. म्हणून तेही बायकोच्या चार हात दूर राहातात. पण याचा परिणाम दोघांच्या फक्त शारीरिक जवळीकतेवर होतो असं नाही तर ती दोघं जीवनातल्या या अत्यंत संवेदनशील, हळव्या आणि अवघड प्रसंगी मनानंही दूर जातात.
केमोथेरीपीमुळे, औषधांमुळे स्त्रीच्या शरीरावरही परिणाम होतो. त्यांच्या योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा येतो, खाज असते. याचा परिणाम म्हणून स्त्रीमध्ये संबंधांची  इच्छाच नाहीशी होते. रूग्णांनी ही समस्या डॉक्टरांकडे सांगितली तर डॉक्टर औषधांमध्ये काही बदल करू शकतात. 
कॅन्सरसारख्या आजारात जोडीदाराची सोबत, त्याचा सहवास, त्याचं प्रेम, आधार या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जोडीदारासोबतची जवळीक कॅन्सरविरूध्दच्या लढाईत खूप बळ देवून जाते.  याकाळात नवरा बायकोंमध्ये दोघांच्या संमतीने, एकमेकांचा कम्फर्ट बघून शारीरिक संबंध घडून आले तर उत्तमच पण ते होवू शकले नाहीत तर जवळीक अर्थात  ‘इंटमसी’ही खूप महत्त्वाची असते. एकमेकांच्या जवळ असणं, आधारानं पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवणं,हातात हात घालून बसणं, चालणं, एकमेकांना मीठीत घेणं, जवळ झोपणं यासारख्या जवळीकतेतूनही खूप काही साधलं जातं. यातून नवरा बायकोच्या नात्यातला ओलावा टिकून राहातो. आणि जो आधार, जी संवेदनशीलता, जो मऊपणा  या आजारात आवश्यक असतो तो या जवळीकतेतून  जोडीदाराकडून मिळू शकतो.

शारीरिक संबंधांबाबत रूग्ण आणि त्यांच्या जोडीदाराच्या ज्या समस्या असतात, किंवा जे पूर्वग्रह आणि समज असतात ते तसेच न ठेवता त्याबाबत डॉक्टरांशी खुलेपणानं बोललं तर या समस्या वेळीच सुटतात.

 

सूत्र 3

जीवनातला सूर, रंग आणि अर्थ शोधण्यासाठी

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला आहे हे दुसर्‍यांनी, घरातल्यांनी समजून घेण्याऐवजी तो आधी रूग्णानं स्वत: स्विकारला पाहिजे. आपल्या हातात आणि नियंत्रणात जे जे शक्य आहे ते ते आपण करणार हा निर्धार स्वत:शी करायला हवा. 
या आजारानं जो अपराधीभाव मनात निर्माण होतो तो आधी झटकून द्यायला हवा. विशेषत: स्रियांनी.  आपल्यासाठी इतके सगळेजण करता आहेत तर 
 ‘ ठीक आहे’, असं म्हणून आपणही त्यांची मदत मोठ्या मनानं आणि खुलेपणानं स्विकारायला हवी. त्यांच्या मदतीला दाद द्यायला हवी. 
किमोमुळे तोडांची चव बदलते. त्यामुळे जोडीदारानं  किंवा घरातल्यांनी केलेला स्वयंपाक अळणी वाटू शकतो पण चिडचिड न करता आपल्याला कोणत्या चवीचं हवं आहे हे स्त्रीनं हक्कानं सांगायला हवं. किंवा आपण स्वत: स्वयंपाक करणार असू तर आपल्या चवीची काळजी आपण घ्यायला हवी. 
ज्या कोणत्याही प्रतिक्रिया मनात निर्माण होतात त्या दाबून न ठेवता व्यक्त करायला हव्यात. मन मोकळं केलं की आपोआप हलकं होतं, छान वाटतं.
कॅन्सरवरच्या उपचारादरम्यान, उपचारानंतर स्वत:ला गुंतवून ठेवणं, मन रमवणं, स्वत:साठी आनंद निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. यासाठी आपले छंद, आपली आवड, आपल्यातली कला या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. याकाळात आपला छंद जोपासला, नवीन कला शिकली तर शरीराच्या संघर्षात सोबत करायला मनाला बळ मिळतं. वाचन, लेखनाची आवड असेल तर मन त्यात गुंतवता येतं. गाणे ऐकण्याची आवड असेल तर आवर्जून चांगलं संगीत ऐकावं. चित्र कलेची आवड असेल तर चित्र काढण्यात मन रमवावं. 
कलर थेरपी ही या आजारात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचा छोटासा प्रयोग आपण घरच्याघरीही करू शकतो. आपल्या आवडीच्या रंगांचा वापर करून आपण आपला रोजचा मूड छान आणि प्रसन्न ठेवू शकतो.  मूड चांगला नसला की हा प्रयोग हमखास करावा. मूड चांगला नसला की आपण काहीही घालून तयार होतो. त्यामुळे तर  आणखीनच डलनेस येतो. मूड नसताना आवर्जून आपल्या आवडीच्या रंगाचे कपडे घालावेत यामुळेही मूड चांगला होतो.  घरातआवडीच्या रंगाच्या बेडशीटस, खिडक्यांच्या पडद्यांमुळेही मनाला छान वाटू शकतं. 
 मनाला उभारी मिळण्यासाठी निसर्गातल्या रंगाचाही उपयोग करता येतो.  बरेचदा कॅन्सर रूग्ण स्वत:ला घरात डांबून ठेवतात. त्यांना मोकळी हवा मिळत नाही. बाहेर पडताना उन्हापासून सरंक्षण होईल एवढी काळजी घेवून रूग्णांनी आवर्जून बाहेर पडावं. निसर्गातले रंग बघून, झाडा फुलांच्या सोबतीतला सुगंध अनुभवूनही ही मूड चेंज होतो. निसर्गाच्या सान्निध्यात मनावरचा ताण गळून पडतो. 
आवड, छंद, कला आणि रंग यांच्या मदतीने कॅन्सर रूग्ण स्वत:च्या जीवनातला आनंद स्वत: शोधू शकतात. स्वत:च्या हातानं हा आनंद निर्माण करू शकतात. हा आनंद या कॅन्सरसारख्या आजाराचा सामाना करताना खूप सकारात्मक परिणाम करतो. 

सूत्र 4
सल्ला मार्गदर्शन हवंच!

कॅन्सरचं निदान झाल्यावर आजूबाजूला सल्ला देणारे, खरंतर सल्ल्याच्या आडून घाबरवणारे खूप भेटतात.  त्यातून रूग्णापर्यंत सकारात्मकता पोहोचण्याऐवजी नकारात्मकताच पोहोचते. या आजारात प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक कृतीतून सकारात्मकता मिळणं रूग्णासाठी खूप महत्त्वाचं असतं.ज्यांना कॅन्सरबाबत काहीच माहिती नाही, जे फक्त ऐकीव आहे, पूर्वग्रह आणि पूर्वसमजावर आधारित ब्नोलतात किंवा एखाद्या उदाहरणावरून ठाम निष्कर्ष काढून बोलतात त्यांच्या सान्निध्यात रूग्णानं राहूच नये किंवा त्यांच्याशी बोलणं टाळावं. 
कॅन्सरचं निदान झाल्यावर, उपचारादरम्यान आणि उपचारानंतर रूग्णाला त™ज्ञांचं, जाणकारांचं मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं. ही गरज काऊन्सलिंगमार्फत पूर्ण होवू शकते. कॅन्सरचे उपचार ज्या दवाखान्यात चालू असतात तेथे ही सोय असतेच. पण रूग्णाला अजूनही मार्गदर्शनाची, सल्ला मसलतीतून आधाराची गरज वाटल्यास रूग्णानं, त्याच्या नातेवाईकानं डॉक्टरांना ते सांगावं. डॉक्टर याबाबत मदत करू शकतात. 
या आजाराचं स्वरूप, उपचाराची पध्दत, परिणाम, या आजाराशी लढण्याचं सूत्र, बाहेर पडण्याचा मार्ग, स्वत:तली ताकद वापरण्याचा पर्याय या सर्व गोष्टींवर फक्त त™ज्ञच मार्गदर्शन करू शकतात. तेव्हा सल्ला मार्गदर्शनाचे चुकीचे मार्ग टाळून जाणकारांचाच आधार रूग्णानं आणि त्याच्या जोडीदारानं, नातेवाईकानं घेतला तर रूग्णाला फायदा होतो. 

 

 

सूत्र 5
आजारातलं मैत्र 
 

 समदुखी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना एकमेकांचा आधार मिळतो. हेच सूत्र या आजारपणातल्या मैत्राचं आहे. या आजारातून, उपचार प्रक्रियेतून जे रूग्ण यशस्वीरित्या बाहेर पडले आहेत त्यांच्याशी बोलून कॅन्सर रूग्णांना बळ मिळतं. हाही/ हीही यातूनच तर गेली आहे मग तो किंवा ती आनंदी राहू शकतो तर आपण का नाही? हा विश्वास रूग्णाला मिळतो. रूग्णाला होणा-या त्रासाबद्दल मनमोकळं बोलता येतं. यातून समोरच्यानं काय मार्ग काढला हे समजून घेवून त्यांना त्यांचा मार्ग शोधण्यास मदत मिळू शकते. अशा या सपोर्ट ग्रूपची कॅन्सर रूग्णांना खूप आवश्यकता असते. त्यांचा आधार रूग्णांनी अवश्य घ्यावा. तशी गरज त्यांनी डॉक्टरांकडे बोलून दाखवावी. डॉक्टरांकडे अशा सपोर्ट ग्रूपची माहिती असते त्यांची मदत घेवून रूग्णांनी सपोर्ट ग्रूपचा अवश्य सपोर्ट घ्यावा. 

तज्ञ सल्ला: डॉ.  राज नगरकर
                  डॉ. निष्ठा पालेजा
(मानवता क्यूरी  हॉस्पिटल, नाशिक)


 

Web Title: Cancer- Is the victory ahead! Only these five formulas should be implemented!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.