मेथीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:25 PM2018-11-13T14:25:44+5:302018-11-13T14:28:18+5:30

आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. मग कारण सांगितली जातात आणि त्यावर घरातल्यांचा ओरडा पडल्याशिवाय राहत नाही.

9 reasons why you should add methi to your diet | मेथीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

मेथीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext

आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. मग कारण सांगितली जातात आणि त्यावर घरातल्यांचा ओरडा पडल्याशिवाय राहत नाही. हे सर्व खरं असलं तरीही धावपळीच्या दैनंदिन जीवनात आरोग्य चांगलं राखण्यासाठी डॉक्टरांकडूनही अनेकदा हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देण्यात येतो. अशातच अनेकदा बाजारामध्ये मेथी सर्रास दिसून येते. त्यातल्यात्यात हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खाणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव होतो. 

मेथीपासून भाजी, पाराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. याचे शरीरालादेखील अनेक फायदे होतात. जाणून घेऊया शरीराला होणाऱ्या मेथीच्या फायद्यांबाबत...

1. ब्लड प्रेशर

मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून खाल्याने ब्ल़ प्रेशरची समस्या दूर होते. ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरची समस्या उद्धवते त्यांनी मेथीची भाजी खाणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

2. ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी 

मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे ह्रदयाचे आरोग्य नियंत्रित राहते. त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियमुळे सोडीयमच्या कार्यावर नियंत्रित राहते ज्यामुळे हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतात.

3. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी 

मेथीमध्ये फायबर आणि अन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकली जातात. कधीकधी अपचन अथवा पोटदुखी असल्यास मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो. सकाळी उठल्यावर मेथीपासून तयार केलेला काढा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून सुटका होते.

4. डाबिटिज नियंत्रणात राहते

ज्या व्यक्तींना डायबिटिजचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी दोन्ही फायदेशीर ठरतात. आहारामध्ये मेथीचा समावेश केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या तत्वामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्याचप्रमाणे मेथीमधील अमिनो अॅसिड या घटकामुळे इन्सुलीनच्या निर्मितीस देखील चालना मिळते. 

5. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी

दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात भूक कमी लागते.ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठता येते. 

6. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

काही संशोधनातून असं आढळून आलं की, मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड चे शोषण टाळले जाते.

7.  मासिक पाळीतील समस्यांवर उपाय

मेथीमध्ये डायोस्जेनिन,आयसॉफ्लॅवेन्स,अॅस्टोजिन यांसारखी पोषक तत्व आढळून येतात. यामुळे मासिक पाळीमध्ये होणारी पोटदुखी दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये आयर्न तयार करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते. 

8. त्वचेच्या समस्या दूर होतात 

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिम्पल्स, सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक उपयोगी ठरतो. त्यासाठी मेथीचे दाणे पाण्यात टाकून उकळवून घ्या आणि ते पाणी चेहरा धुण्यासाठी वापरा. त्याचप्रमाणे ताज्या मेथीची पानांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानेही अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. 

9. केसांच्या समस्या दूर होतात 

मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे आणि चमकदार होतात. केस गळत असल्यास खोबऱ्याच्या तेलामध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा. मेथीमुळे केसांतील कोंड्याची समस्याही दूर होते. 

Web Title: 9 reasons why you should add methi to your diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.